६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते श्री. निषाद देशमुख यांची सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

श्री. निषाद देशमुख

१. निरपेक्षता आणि प्रेमभाव

निषाद यांच्यातील ‘निरपेक्षता आणि प्रेमभाव’ या गुणांत वृद्धी झाली आहे. ते इतरांना साहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर असतात.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

२. सूक्ष्म ज्ञानासंबंधी लिहिलेले लेख वाचतांना आनंद जाणवणे

त्यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सूक्ष्म ज्ञानासंबंधी प्रसिद्ध झालेले लेख वाचत असतांना मला आनंद जाणवतो. ते सूक्ष्म ज्ञानासंबंधीचे लेख सोप्या भाषेत लिहितात.

३. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात यज्ञ किंवा धार्मिक विधी असतांना निषाद निवेदन करतात. तेव्हा ते ओघवत्या वाणीतून संबंधित देवतेविषयी माहिती सांगतात. त्यांच्या बोलण्यात ‘देवाविषयीचे ज्ञान’ आणि ‘देवाप्रतीचा कृतज्ञताभाव’ हे दोन्ही घटक जाणवतात.

४. नेतृत्वगुण, नियोजनकौशल्य, निर्णयक्षमता आणि प्रेमभाव आदी गुण असणे

ते आमचे (सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांचे) नेतृत्व करतात आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ किंवा ग्रंथ अन् संकलन यांच्याशी संबंधित सेवा करणारे साधक आणि पुरोहित यांच्याशी चांगला समन्वय साधून आमच्या सेवांचे नियोजन करतात. यातून त्यांच्यातील प्रेमभाव, नेतृत्वगुण, नियोजनकौशल्य आणि निर्णयक्षमता आदी गुण जाणवतात.

५. व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही स्तरांवरील सेवा उत्साहाने अन् आनंदाने करणे

त्यांची व्यष्टी साधनेची घडी चांगली बसली आहे. त्यामुळे ते त्यांच्या बहिणीला घरकामात साहाय्य करणे, पाहुण्यांना आश्रम दाखवणे, अल्पाहार सेवेची सिद्धता करणे इत्यादी समष्टी सेवा ‘सूक्ष्म परीक्षण करणे आणि ईश्वरी ज्ञान मिळवणे’ या सेवांप्रमाणेच उत्साहाने अन् आनंदाने करतात.

६. प्रार्थना आणि कृतज्ञता

‘हे देवा, श्री. निषाद अनेक गुणांचे सागर आहेत. त्यांच्याकडून मला जितके शिकता येईल, तितके मला शिकता येऊ दे आणि माझ्यातही त्यांच्याप्रमाणे विविध दैवी गुण विकसित होऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

मला श्री. निषाद यांना घडवणार्‍या त्यांच्या माता-पित्यांविषयीही कृतज्ञता वाटते. अशा अनमोल साधकरत्नासमवेत सेवा आणि साधना करण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक