श्रीमंत योगी !

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आल्यावर प्रत्येक हिंदूच्या मनात एक नवी ऊर्जा संचारू लागते. आपल्याला ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप’, या वाक्याचे स्मरण प्रकर्षाने होते. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांनी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांचे गुण अंगीकारण्याचा प्रयत्न प्रत्येकाने थोड्या बहुत प्रमाणात जरी केला, तरी ती त्यांना खरी आदरांजली ठरेल.

समर्थ रामदासस्वामी छत्रपती शिवरायांचे वर्णन करतांना म्हणतात, ‘निश्चयाचा महामेरू । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।’ यामध्ये समर्थांनी छत्रपती शिवरायांचे ‘श्रीमंत’ म्हणून वर्णन तर केलेच आहे; परंतु त्यासमवेत त्यांना ‘योगी’ असेही संबोधिले आहे. यातच सर्व काही आले. श्रीमंत असूनही निरिच्छ असणे, हेच त्यांचे वैशिष्ट्य या दोन शब्दांत आले आहे. छत्रपती िशवरायांचे आध्यात्मिक सामर्थ्य हे समर्थांनी त्यांना दिलेल्या या नावातूनच लक्षात येते. ‘सर्व संपत्ती प्रजेच्या, रयतेच्या हितासाठीच आहे’, या साक्षीभावाने छत्रपती शिवराय या राज्याकडे पहात असत. याचे एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे सुरतेवर स्वारी करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सावकाराकडे काही रक्कम मागितली. तेव्हा सावकार त्यांना म्हणाला, ‘राजे, तुम्हाला काहीतरी तारण ठेवावे लागेल.’ तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्या सावकाराला म्हणाले, ‘आमच्याकडे तुम्हाला देण्यासारखे काही नाही; कारण हे जे काही राज्य आहे, त्यावर आमचा अधिकार नसून त्यावर रयतेचा अधिकार आहे.’ त्यानंतर त्यांनी गवताचे एक पाते उचलले, त्या सावकाराला दिले आणि म्हणाले, ‘हे पाते गहाण ठेवतो आणि स्वारीवरून आल्यावर तुमची रक्कम देतो, तोपर्यंत हे पाते जपून ठेवा.’

पुढे स्वारीवरून आल्यावर छत्रपती शिवरायांनी सावकाराला रक्कम चुकती केली आणि ते पाते परत मागितले. सावकाराने तिजोरीतून गवताचे पाते काढून दिले आणि विचारले, ‘या गवताच्या पात्याचे इतके काय महत्त्व आहे ?’ तेव्हा छत्रपती शिवराय म्हणाले, ‘या गवताच्या पात्यावरही आमचा अधिकार नाही, तो रयतेचा आहे. त्यामुळे आम्हाला तेही महत्त्वाचे आहे.’ अशाच प्रकारे शेतकर्‍याच्याही गवताच्या पात्याला धक्का लागू नये, ही राजांची विचारसरणी होती. याउलट सध्याच्या लोकप्रतिनिधींची मंत्रीपद गेल्यावरही शासकीय निवास न सोडण्याची मानसिकता असते आणि ते जनतेचा पैसा म्हणजे स्वतःची मालमत्ता समजून तो वापरतात. अशा राजकारण्यांना छत्रपती शिवरायांसारखा दृष्टीकोन ठेवणे कधी तरी जमू शकेल का ?

– श्री. जयेश बोरसे, पुणे