Brazil On Hamas Killings : नेतान्याहू पॅलेस्टिनींचा नरसंहार करत आहेत ! – ब्राझीलचे राष्ट्रपती

  • इस्रायल-हमास युद्ध

  • नेतान्याहू यांची हिटलरशी केली तुलना !

  • ही टिप्पणी लज्जास्पद ! – नेतान्याहू

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा व इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

अदिस अबाबा (इथिओपिया) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध चालू होऊन आता साडेचार महिने होत आले आहेत. यामध्ये आतापर्यंत २८ सहस्रांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत. यावर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची तुलना जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलर याच्याशी केली. दा सिल्वा म्हणाले की, नेतान्याहू गाझामध्ये नरसंहार करत आहेत. ते पॅलेस्टिनींवर ज्याप्रकारे अत्याचार करत आहेत, ते हिटलरने ज्यूंवर केले होते. गाझामधील इस्रायने केलेली कारवाई ही ज्यूंच्या ‘होलोकॉस्ट’सारखी (नरसंहारासारखी) आहे. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथे झालेल्या आफ्रिकन युनियन शिखर परिषदेत लुला यांनी वरील विधान केले.

(सौजन्य : TRT World)

ज्यूंच्या ‘होलोकॉस्ट’मध्ये ६ वर्षांत अनुमाने ६० लाख ज्यूंना ठार करण्यात आले होते. यांपैकी १५ लाख मुलांचा समावेश होता.

इस्रायलचे प्रत्युत्तर !

बेंजामिन नेतान्याहू यांनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या टिप्पणीला ‘लज्जास्पद’ म्हटले आहे. या प्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी इस्रायल सरकारने इस्रायलमधील ब्राझीलच्या राजदूताला बोलावण्यात आले. नेतान्याहू म्हणाले की, जोपर्यंत हमास ही आतंकवादी संघटना नष्ट होत नाही, तोपर्यंत गाझावरील आक्रमण थांबवणार नाही.