श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पौष वारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक !

वर्षा बंगला येथून ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक घेतांना मुख्यमंत्री

मुंबई – शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेने केलेल्या मागणीनुसार श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज पौष वारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला येथून ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक घेतली. या बैठकीत मांडल्या गेलेल्या सर्वांची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पूर्तता केली. या संदर्भात धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले म्हणाले, ‘‘आतापर्यंतच्या त्र्यंबकवारी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून घेतलेली ही पहिली आढावा बैठक आहे. यातून वारकरी संप्रदायाविषयी मुख्यमंत्री महोदयांना असलेली तळमळ आणि श्रद्धाभाव दिसून येतो.’’

‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे झालेल्या बैठकीत उपस्थित मान्यवर
‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे झालेल्या बैठकीत सूत्रे मांडतांना ह.भ.प. अक्षय महाराज भोसले

बैठकीतील प्रमुख मागण्या

१. संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान वारी कालावधीमध्ये भाविकांकरता लक्षावधी रुपये व्यय करून यात्रेच्या अनुषंगाने विशेष सिद्धता करते. हा व्यय प्रशासनाने करावा, अशी मागणी केल्यावर मुखमंत्र्यांनी तात्काळ प्रशासनाला सूचना देत त्र्यंबक पौष वारीसाठी आवश्यक तो पूर्ण निधी देण्यासाठी सूचित केले. यातून दर्शन बारी आणि आवश्यक त्या वारकर्‍यांच्या सोयीसाठीची यंत्रणा उपलब्ध करण्यात येणार आहे.

२. वारी काळात विशेष वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

३. स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि काटेकोरपणे सुरक्षा व्यवस्था याविषयी विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

४. वारीला येणार्‍या प्रवाशांच्या वाहनांना पथकर माफ करण्यात येणार आहे, तसेच ‘श्री विठ्ठल रुक्मिणी विमा छत्र योजना’ पौष वारीकरता लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या बैठकीसाठी नाशिक जिल्हा पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, त्र्यंबक नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचके, संत निवृत्तीनाथ संस्थानचे अध्यक्ष श्री. नीलेश गाढवे आणि सचिव श्री. घोटेकर यांसह विविध अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.