१४ जानेवारी २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या लेखात ‘परात्पर गुरुदेवांनी समष्टी साधना कशा प्रकारे करावी ? आणि त्याप्रमाणे ती करून घेणे’, याविषयी वाचले. आजच्या लेखात ‘परात्पर गुरुदेवांनी विविध प्रसंगातून ‘आज्ञापालन करणे’ आणि ‘विचारून घेणे’, या गुणांचे महत्त्व मनावर कसे ठसवले’, याविषयीची माहिती या लेखाद्वारे येथे देत आहोत.
(भाग ६)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/754646.html
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मोठ्या कार्यक्रमांच्या नियोजनाची पुष्कळ व्यस्तता असतांनाही प्रतिदिन ३ घंटे नामजप करण्याचा निरोप देऊन साधकाची क्षमता वाढवणे
१ अ. मोठ्या कार्यक्रमांच्या नियोजनाच्या सेवेची असलेली व्यस्तता : वर्ष २००८ मध्ये मी उत्तर भारताच्या दौर्यावर असतांना तिकडे मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करायचे होते. त्यामुळे माझे दिवसभराचे नियोजन पुष्कळ व्यस्त असायचे. ८ – १० दिवसांवर मोठे कार्यक्रम असायचे. त्यामुळे कार्यक्रमांच्या सेवांचे नियोजन करण्यासाठी ‘साधकांचे सत्संग घेणे, विविध सेवासमित्या स्थापन करून सेवेची पूर्वसिद्धता करून घेणे, कार्यक्रमाच्या प्रचाराचे नियोजन करणे आणि त्याचा आढावा घेणे, वक्ते अन् सूत्रसंचालक यांचा सराव घेणे, कार्यक्रमाची प्रसिद्धी आणि साधकांचे निवास-भोजन इत्यादींची व्यवस्था पहाणे’, अशा पुष्कळ सेवा सातत्याने चालू असायच्या. मला वैयक्तिक वेळ नसायचा.
१ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रतिदिन ३ घंटे नामजप करण्याचा निरोप दिल्यावर त्यांच्या कृपेने कुठे वेळ मिळेल, तो नामजपासाठी वापरल्यामुळे ३ घंटे नामजप होऊ शकणे : याच सुमारास मी मध्यप्रदेशातील इंदूर येथे एका मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी मला प्रतिदिन ३ घंटे नामजप करण्याचा निरोप पाठवला. मी सलग एक घंटाही नामजपासाठी बसू शकत नव्हतो, इतकी सेवांची व्यस्तता होती; पण ‘प.पू. डॉक्टरांनी सांगितले आहे, तर आज्ञापालन करणे’, हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे मी ‘नामजपाचे नियोजन करण्यासाठी कुठे वेळ मिळू शकतो ?’, याचा विचार करत होतो. अभ्यास केल्यावर माझ्या लक्षात आले, ‘सकाळी वैयक्तिक लवकर आवरून अल्पाहारापर्यंतचा वेळ, अल्पाहार आणि जेवण पटकन आवरून बैठक चालू होईपर्यंतचा वेळ, २ बैठकांच्या मधील वेळ (पहिल्या बैठकीतील साधक गेल्यावर पुढच्या बैठकीला साधक जमेपर्यंत लागणारा १० – १५ मिनिटांचा वेळ)’, या वेळेत नामजप करू शकतो. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने असा थोडा थोडा वेळ नामजप करून दिवसभरात ३ घंट्यांचा नामजप पूर्ण व्हायचा.
१ इ. प्रतिदिन ३ घंटे नामजप केल्यावर जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे
१. ‘प्रतिदिन ३ घंटे नामजप करूनही माझ्या कुठल्याही दैनंदिन नियोजनावर परिणाम झाला नाही’, ही माझ्यावर असलेली प.पू. गुरुदेवांची कृपाच होती.
२. नामजपामुळे दिवसभरातील पूर्ण वेळ पूर्णपणे साधनेसाठी वापरला गेला. ‘मी जो वेळ नामजप करण्यासाठी वापरला असता, त्या वेळेचा सेवेसाठी उपयोग करू शकतो’, हे माझ्या कधीच लक्षात आले नसते.
३.‘श्री गुरूंच्या संकल्पाने अवघड गोष्टी किती सहज होऊन जातात ?’, ‘श्री गुरु साधकाची क्षमता कशी वाढवतात ? आणि त्याला साधनेत पुढे पुढे कसे घेऊन जातात ?’, हे मला शिकता आले.
४. प.पू. गुरुदेवांनी ३ घंटे नामजप करण्यास सांगितल्यामुळे माझे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण झाले.
५. नामजपामुळे माझा उत्साह आणि कार्यक्षमता वाढण्यास साहाय्य झाले.
पुढे सेवांचे दायित्व वाढल्यावर ‘गुरुकृपेने स्वतःच्या क्षमतेचा अधिकाधिक विकास कसा होत जातो ?’, हे शिकता आले. त्यामुळे समष्टी सेवा कितीही वाढल्या, तरी व्यष्टी साधना नियमित होते.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकाला मानसिक स्तरावर विचार न करता आध्यात्मिक स्तरावर विचार करण्यास शिकवणे
२ अ. कर्णावती येथील मोठ्या कार्यक्रमाच्या सेवा चालू असतांना ‘साधकांनी मराठी भाषेऐवजी हिंदीतून आरती म्हणावी’, असे वाटणे, तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘ती मराठीतूनच म्हटली जाऊ दे’, असा निरोप पाठवणे : वर्ष २००८ मध्ये मी कर्णावती (अहमदाबाद) येथे गेलो होतो. तेथील बरेचसे साधक मराठी भाषिक असून काही साधक गुजराती भाषिक आहेत. सेवांसाठी आम्ही एकत्र रहात असतांना तेथील साधक सकाळ-संध्याकाळ मराठीतून आरती करायचे. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘आपण गुजरातमध्ये आहोत, तर हिंदी या सामायिक भाषेत आरती करावी.’ याविषयी मी प.पू. डॉक्टरांना साधकाकडून निरोप देऊन विचारल्यावर त्या साधकाने कळवले, ‘‘मराठी भाषेत पुष्कळ चैतन्य आहे. त्यामुळे साधक आरती मराठीत म्हणत आहेत, ते तसेच चालू राहू दे.’’
२ आ. इतर भाषांच्या तुलनेत संस्कृत आणि मराठी भाषेत अधिक चैतन्य असणे : सर्वत्रचे पुरोहित पूजाविधीसाठी असलेले मंत्र संस्कृतमध्येच म्हणतात. सर्व श्लोक, पोथ्या, अनेक ग्रंथ, वेद इत्यादी संस्कृतमध्ये आहेत; कारण संस्कृत ही देवभाषा असून तिच्यात १०० टक्के चैतन्य आहे. मंत्रपठण करतांना त्याचा लाभ समाजाला मिळावा; म्हणून लाखो वर्षानंतरही ते संस्कृतमध्येच म्हटले जातात. सर्वसामान्य व्यक्तीला संस्कृत कठीण वाटते. संस्कृत खालोखाल मराठी भाषेत अधिक प्रमाणात, म्हणजे ६० टक्के चैतन्य आहे. त्यामुळे गुजराती किंवा हिंदी भाषेपेक्षा ‘मराठीमध्ये आरती म्हटल्यास त्याचा आध्यात्मिक स्तरावर सर्व साधकांना अधिक लाभ होऊ शकतो’, हे प.पू. गुरुदेवांच्या कृपेने माझ्या लक्षात आले.
माझा हिंदी भाषेत आरती म्हणण्याविषयीचा विचार मानसिक स्तरावरचा होता. वरील प्रसंगातून ‘प.पू. डॉक्टरांनी आध्यात्मिक स्तरावर कसा विचार करायला हवा ?’, ते मला शिकवले.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकाकडून आज्ञापालन करून घेऊन ‘त्याचा अहं वाढू नये’, याची काळजी घेणे
३ अ. विजापूर येथे साधनाविषयक सभेच्या प्रचाराला उत्तम प्रतिसाद मिळणे आणि पुष्कळ विरोधही होणे : नोव्हेंबर २००९ मध्ये कर्नाटकातील विजापूर येथे पहिल्या साधनाविषयक सभेचे आयोजन केले होते. सभेच्या प्रचाराला उत्तम प्रतिसाद होता आणि मोठ्या प्रमाणात विरोधही होत होता. त्यामुळे प्रतिदिन काहीतरी नवीन घडत होते. विजापूरमध्ये अन्य धर्मियांचे प्रमाण पुष्कळ आहे. त्यामुळे प्रचार करतांना काळजी घ्यावी लागत होती.
३ आ. सभेच्या २ दिवस आधी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विजापूरहून मंगळुरू येथील मुल्की येथे जायचा विचार देणे : सभेच्या प्रचाराला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे साधकांमध्येही उत्साह होता. सर्वांना ‘सभेला चांगली उपस्थिती असेल’, असे वाटत होते. सभेला २ दिवस असतांना माझ्या मनात प.पू. गुरुदेवांच्या कृपेने अचानक विचार आला, ‘सभेची सेवा सोडून दुसर्या एका सेवेसाठी मंगळुरू येथील मुल्की येथे जायला हवे.’ माझ्या मनात विचार आला, ‘सभेला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आणि विरोधही पुष्कळ आहे. साधकांना सर्व हाताळायला जमेल का ? आपण थोडे नियोजन बघून नंतर किंवा उद्या सकाळी निघूया’; परंतु मनात आलेला विचार पुन्हा तीव्र झाला. तेव्हा ‘माझ्याकडून आज्ञापालन झाले नाही’, ही चूक माझ्या लक्षात आली आणि मी लगेचच तिथून मुल्कीला गेलो.
३ इ. विजापूरच्या सभेला जिज्ञासूंची पुष्कळ उपस्थिती लाभल्यामुळे ‘साधकाचा अहं वाढू नये’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्याला मुल्की येथे पाठवणे : विजापूरची सभा पुष्कळ छान झाली. विजापूर येथे झालेल्या सभेला आतापर्यंत कर्नाटकात झालेल्या सर्व कार्यक्रमांपेक्षा सर्वाधिक, म्हणजे १६ सहस्र एवढी उपस्थिती होती. मी तिथे असतो, तर ‘मी एवढे चांगले नियोजन केल्यामुळे हे झाले’, असा अहंयुक्त विचार माझ्या मनात निश्चितच आला असता. मी नसतांनाही एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन साधकांनी चांगल्या प्रकारे केले. त्यामुळे माझे कर्तेपणाचे विचार किती चुकीचे होते, तसेच ‘कर्ता-करविता भगवंत असून त्याला अशक्य असे काहीच नाही’, हा भाव माझ्यात अल्प पडला’, हे गुरुदेवांनी मला दाखवून दिले.
श्री गुरूंचे आज्ञापालन करण्यापेक्षा बुद्धीने विचार करून ‘येथील सेवांचे चांगले नियोजन करून जाऊया’ किंवा ‘साधकांना हे सर्व हाताळता येणार नाही’, यांसारखे चुकीचे आणि अहंयुक्त विचार माझ्या मनात होते. या प्रसंगातून गुरुदेवांनी मला त्याची अप्रत्यक्षपणे जाणीव करून दिली. यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.
३ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकाच्या मनातील सूक्ष्मातीसूक्ष्म अहंचे विचार ओळखून त्याचे आध्यात्मिक अधःपतन होण्यापासून वाचवणे : ‘साधनेत बुद्धी अडथळा म्हणून कसे कार्य करते ? आणि आपला अहं कसा वाढवते ?’, हे साधकांना कळत नाही; परंतु सर्व शक्तीमान अन् सर्वज्ञ असे श्री गुरु साधकाच्या मनातील प्रत्येक सूक्ष्मातिसूक्ष्म विचार ओळखून ‘त्याचे आध्यात्मिक अधःपतन होण्यापासून त्याला कसे वाचवतात ?’, याचे हे उत्तम उदाहरण आहे’, असे मला वाटते.
४. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘कुठलेही नवीन नियोजन करतांना ते विचारून घ्यायला हवे’, हे शिकवणे
४ अ. कर्नाटकातील गदग येथे होणार्या कार्यक्रमाला इतर जिल्ह्यातील साधकांना शिकण्यासाठी बोलावणे : वर्ष २००८ च्या एप्रिल मासात कर्नाटकातील गदग येथे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तो कर्नाटकातील पहिला मोठा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या नंतर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये असे मोठे कार्यक्रम घेण्याचे नियोजन करायचे होते. पहिल्या कार्यक्रमाला अन्य जिल्ह्यांतील साधकांना बोलावल्यास त्यांना ‘मोठा कार्यक्रम कसा असतो ?’ आणि ‘अशा कार्यक्रमाचे नियोजन कसे करावे ?’, हे सर्व शिकायला मिळेल. त्यामुळे ‘त्यांच्या जिल्ह्यात अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे थोडे सोपे होऊ शकेल’, या विचाराने आम्ही (मी आणि कर्नाटकातील उत्तरदायी साधक) कर्नाटकातील काही साधकांना आदल्या दिवसापासून गदग येथे बोलावण्याचे नियोजन केले.
४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘एवढे (१५०) साधक शिकायला बोलावणे’, ही चूक आहे’, असे साधकाद्वारे कळवणे : कर्नाटक राज्यातून अनुमाने १५० साधक शिकण्यासाठी आले होते. याविषयी मी एका साधकाच्या माध्यमातून गुरुदेवांना कळवले, ‘‘आम्ही कर्नाटकातील पहिल्या मोठ्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अन्य जिल्ह्यांतील साधकांना शिकण्यासाठी बोलावले होते. त्यांना पुष्कळ शिकायला मिळाले.’’ तेव्हा त्याने मला कळवले, ‘‘ही पुष्कळ मोठी चूक आहे. एवढे मोठे नियोजन करण्याआधी विचारायला हवे होते. त्या सर्वांचा येण्या-जाण्याचा पुष्कळ व्ययही झाला. ही चूक सत्संगामध्ये सांगायला हवी.’’ आरंभी मला ‘मी चांगले नियोजन केले’, असे मला वाटत होते; पण ते पूर्णपणे चुकले होते.
४ इ. शिकायला मिळालेली सूत्रे
१. कुठलेही वेगळे नियोजन करतांना ते विचारून घेतल्यास ‘योग्य काय ?’ ते कळू शकते.
२. स्वतःच्या स्तरावर वेगळे नियोजन केल्यामुळे अहं वाढतो आणि विचारण्याची वृत्ती न्यून होते.
३. मोठ्या चुकांमुळे साधनाही अधिक व्यय होते.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, साधकांना साधनेत पुढे नेण्यासाठी तुम्ही अनेक माध्यमांतून अखंडपणे शिकवत असता. प्रत्येक साधकाच्या प्रकृतीनुसार आणि त्याच्या साधनामार्गानुसार त्याच्या जीवनात प्रसंग घडवून आणता. त्याला आवश्यक ते ज्ञान देऊन ते प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी तुम्हीच साधकांना प्रेरणा देता. यासाठी तुमच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्याच चरणी अर्पण ! (३१.७.२०२३)
(क्रमशः पुढच्या रविवारी)
इदं न मम ।’
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
|
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/763645.html