परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध प्रसंगांतून ‘समष्टी साधना कशा प्रकारे करायला हवी ?’, ते शिकवून ती करून घेणे

भक्त किंवा शिष्य बनण्यात जो आनंद आहे, तो महाराज किंवा गुरु बनण्यात नाही ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

७ जानेवारी २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या लेखात ‘समष्टी साधनेचे महत्त्व मनावर बिंबल्यामुळे समष्टी सेवा केली आणि त्या माध्यमातून आध्यात्मिक प्रगती कशी झाली ?’, याविषयी वाचले. आजच्या लेखात ‘परात्पर गुरुदेवांनी समष्टी साधना कशा प्रकारे करावी ? आणि त्याप्रमाणे ती करून घेणे’, याविषयीची माहिती येथे देत आहोत.  

(भाग ५)

(सद़्‍गुरु) राजेंद्र शिंदे

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पुष्कळ दूर रहात असलेल्या एका साधिकेची साधना व्हावी’, यासाठी साधकाकडून प्रयत्न करून घेणे

१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पुष्कळ दूर रहात असलेल्या एका साधिकेची साधना व्हावी’, यासाठी साधकाला तिकडे जाऊन मार्गदर्शन करण्यास सांगणे : एप्रिल २००९ मध्ये मी कर्नाटक येथे सेवा करत असतांना चेन्नई येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी गेलो होतो. तो कार्यक्रम झाल्यावर मी प.पू. डॉक्टरांना एका साधकाच्या माध्यमातून चेन्नई येथून पुन्हा कर्नाटक येथे जाण्याविषयी विचारले. त्यांनी मला मदुराई येथे जाण्यास सांगितले. मदुराई चेन्नईपासून अनुमाने ५०० किलोमीटर दूर आहे. ‘तिथे कशासाठी जायचे ?’, हे मला कळले नाही. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तिथे एक साधिका आहे. त्यांना भेटा.’’ माझ्या मनात आले, ‘एका साधिकेला भेटण्यासाठी ५०० किलोमीटर जायला हवे का ?’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘प.पू. भक्तराज महाराज त्यांच्या एका भक्ताला भेटण्यासाठी सहस्रो किलोमीटरचा प्रवास करायचे, तसे आपल्याला आपल्या एका साधिकेला भेटायला जायला नको का ?’’, हे ऐकल्यावर मी लगेच तिकडे जाण्याचे नियोजन केले.

१ आ. मदुराई येथील साधिकेला भेटल्यावर तिला आणि तिच्या कुटुंबियांना पुष्कळ आनंद होऊन त्यांना साधना करण्यास प्रेरणा मिळणे : मदुराई येथे ‘सौ. कृष्णवेणी’ नावाच्या एक साधिका असून त्यांचा प.पू. डॉक्टरांप्रती पुष्कळ भाव आहे. मी तिथे गेल्यावर ‘सौ. कृष्णवेणी, त्यांचे पती आणि त्यांच्या ३ मुली यांची प.पू. डॉक्टरांवर पुष्कळ श्रद्धा आहे’, असे माझ्या लक्षात आले. एवढ्या लांबून ‘मी आणि माझ्यासह शिकायला आलेले २ साधक त्यांच्याकडे आलो’, याचा त्यांना पुष्कळ आनंद झाला. एवढ्या दूर कुणाचेही मार्गदर्शन नसतांना त्यांची साधना आणि अध्यात्मप्रसार चालू होता. त्यांनी तिथे एक सत्संग आणि एक बालसंस्कार वर्ग चालू केला होता. मी तिथे गेल्यावर त्यांच्या सत्संगात येणार्‍या सर्व साधकांना आणि बालसंस्कार वर्गातील मुलांना मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना पुष्कळ आनंद झाला आणि त्यांची साधना करण्याची प्रेरणा वृद्धींगत झाली.

१ इ. मदुराई येथे शिकायला मिळालेली सूत्रे

१ इ १. साधना आणि सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळणे : ‘सनातनची एक साधिका एवढ्या दूर अंतरावर राहूनही ‘एकलव्या’प्रमाणे साधना करत आहे’, हे पाहून आणि त्यांना भेटून मला पुष्कळ आनंद झाला अन् मलाही साधना आणि सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळाली.

१ इ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ‘प्रत्येक साधकाकडे लक्ष असून ते त्याची साधना होण्यासाठी कसे प्रयत्न करतात ?’, ते शिकता येणे : सौ. कृष्णवेणी यांचे प्रयत्न पाहून ‘प.पू. डॉक्टरांनी मला तिकडे जायला का सांगितले ?’, ते माझ्या लक्षात आले. ‘देवाचे प्रत्येक साधकाकडे कसे लक्ष असते ?’, आणि ‘त्याची साधना व्हावी’, यासाठी ‘देव कसे प्रयत्न करतो ?’, हे माझ्या लक्षात आले.

१ इ ३. ‘प्रत्येक साधकाची साधना होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत’, हे शिकता येणे : वरील प्रसंगानंतर प्रचार करतांना ‘साधकसंख्या अल्प असली, तरी प्रत्येक केंद्र आणि उपकेंद्र येथे जायला हवे. एखादा साधक कुठेही साधना करत असला, तरी त्याला भेटायला हवे’, हे मला शिकता आले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी परिस्थितीनुसार अल्प साधकांमध्ये मोठ्या कार्यक्रमांचे नियोजन करायला शिकवणे

२ अ. उत्तर भारतातील राज्यांत प्रथमच साधनाविषयक सभांचे आयोजन केले जाणे आणि या सभांचे आयोजन करण्याची सेवा मिळणे : सप्टेंबर ते डिसेंबर २००८ या कालावधीत प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला उत्तर भारतातील गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांत साधनाविषयक सभांचे आयोजन करण्याची सेवा मिळाली. उत्तर भारतात अशा सभा झाल्या नसल्यामुळे तेथील साधकांना सभेच्या सेवा पूर्णपणे नवीन होत्या. त्यांना या सभेच्या सेवांविषयी काहीच ठाऊक नव्हते.

२ आ. महाराष्ट्रात साधकसंख्या पुष्कळ असल्याने विविध प्रकारच्या सभांचे आयोजन करतांना सर्व सेवांसाठी साधक उपलब्ध असणे : तत्पूर्वी महाराष्ट्रात विविध प्रकारच्या सभांचे आयोजन झाले होते. सभेचे नियोजन करण्यासाठी १०० ते २०० एवढ्या मोठ्या प्रमाणात साधक लागायचे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पुष्कळ साधक असल्यामुळे सभेसाठी आवश्यक असलेल्या ‘अनेक सेवांचे नियोजन करणे, त्यासाठी विविध सेवासमित्या स्थापन करणे’, यासाठी साधक उपलब्ध होत असत.

२ इ. उत्तर भारतात साधकसंख्या अल्प असल्यामुळे सभेच्या सेवांचे नियोजन करणे अवघड वाटणे : मी राजस्थान येथे पहिल्या साधनाविषयक सभेचे आयोजन करण्यासाठी गेलो होतो. मी तेथील उत्तरदायी साधकांना सांगितले, ‘‘उद्या येथील सर्व साधकांना सभेच्या नियोजनाच्या बैठकीसाठी बोलवा, म्हणजे आपल्याला नियोजनाला आरंभ करता येईल.’’ दुसर्‍या दिवशी तेथील सर्व साधक बैठकीला आले. ते सर्व जण मिळून केवळ १० – १२ साधक होते. तेव्हा ‘एवढ्या अल्प साधकांमध्ये सभेच्या सेवांचे नियोजन कसे करायचे ?’, असा मला प्रश्न पडला.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

इदं न मम । (अर्थ : हे लिखाण माझे नाही.)’

– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.(२५.७.२०२३)