Chhatrapati Sambhaji Censor Board : ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाला अद्यापही मिळाले नाही सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र !

छत्रपती संभाजी महाराजांवर औरंगजेबाने इस्लाम स्वीकारण्यास दबाव टाकल्याचे पुरावे सादर करण्यास सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी सय्यद रबी हाश्मी यांनी सांगितल्याचा निर्मात्याचा आरोप !

मुंबई – गेल्या ८ वर्षांपासून मराठी आणि हिंदी भाषांमध्ये बनत असलेला ‘छत्रपती संभाजी’ चित्रपट केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडून (‘सेन्सॉर बोर्डा’कडून) वेळेत प्रमाणपत्र न मिळाल्याने २६ जानेवारी २०२४ या दिवशी प्रदर्शित होऊ शकला नाही. चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक राकेश सुबेसिंग दुलगज यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आरोप केला की, सेन्सॉर बोर्डाच्या मुंबई कार्यालयात नवनियुक्त प्रादेशिक अधिकारी सय्यद रबी हाश्मी यांनी औरंगजेबाने छत्रपती संभाजी यांच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी खरोखर दबाव आणला होता का ?, याविषयीचे पुरावे मागितले होते. याविषयी इतिहासकारांकडून मिळवण्यात आलेले पुरावे देऊनही चित्रपटाला प्रमाणपत्र दिले गेले नाही. सेन्सॉर बोर्डाला चित्रपट दाखवण्यात आल्यावर त्यांनी ‘वेळेतच चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात येईल’, असे सांगितले होते.’ दुलगज यांच्या आरोपांविषयी सय्यद रबी हाश्मी यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

सौजन्य : Sudarshan News

१. दुलगज यांनी सांगितले की, १२ जानेवारी २०२४ या दिवशी सेन्सॉर बोर्डाने चित्रपट पाहिल्यावर मला सांगण्यात आले की, तुम्हाला प्रमाणपत्र दिले जात आहे. चित्रपटात जे काही पालट केले आहेत, त्यांची माहिती मेलवर दिली जाईल.

२. सेन्सॉर बोर्डाकडून हे आश्‍वासन मिळताच दुलगज यांनी ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाची २६ जानेवारी ही प्रदर्शनाची दिनांक अंतिम केली. ते म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत २५ जानेवारीपर्यंत चित्रपटाला प्रमाणपत्र दिले जाईल, असे आश्‍वासन सेन्सॉर बोर्डाकडून देण्यात आले होते. चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दिनांक अंतिम झाल्यानंतर आम्ही सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयाला भेट देत राहिलो; पण कोणताही अधिकारी सापडला नाही.

संपादकीय भूमिका

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळावर केंद्र सरकारचे नियंत्रण असल्याने सरकारने या विषयाकडे लक्ष द्यावे, असेच हिंदूंना वाटते !