वेदमंत्रपठणाच्या वातावरणात बनवल्या जात होत्या श्रीरामाच्या मूर्ती !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील भव्य श्रीराममंदिरात बसवण्यात येणार्‍या श्रीरामाच्या मूर्तीसाठी एकूण ३ मूर्ती बनवण्यात आल्या आहेत. गणेश भट्ट, सत्यनारायण पांडे आणि अरुण योगीराज या ३ शिल्पकारांनी त्या बनवल्या आहेत. यांतील एका मूर्तीची निवड करण्यात आली आहे; मात्र त्याची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. या मूर्ती ज्या ठिकाणी बनवल्या जात होत्या, तेथे सकाळ आणि संध्याकाळ वेदमूर्ती वेदमंत्रपठण करत होते, अशी माहिती आता समोर आली आहे. ६ मास या मूर्ती बनवण्याचे काम चालू होते. त्या काळात हे वेदमंत्रपठण केले जात होते. याविषयी कारागिरांनी सांगितले की, मंत्रपठण केल्याने येथील वातावरण पवित्र झाले होते.

१ सहस्र छिद्रे असलेल्या चांदीच्या भांड्यातून होणार मूर्तीवर जलाभिषेक !

श्रीराममंदिरातील गर्भगृहात स्थापित होणार्‍या श्रीरामाच्या मूर्तीवर १ सहस्र छिद्रे असलेल्या चांदीच्या भांड्यातून जलाभिषेक करण्यात येणार आहे. संपूर्ण पूजेसाठी काशी येथे साहित्य बनवले जात आहे. मंदिराच्या आवारात ईशान्य कोपर्‍यात मंडप बनवण्यात येत असून त्यामध्ये २ फूट खोल आणि रुंद असे ९ कुंड बनवण्यात येत आहेत. हवनात तूप आणि समिधा अर्पण करण्यासाठी आंब्याच्या लाकडापासून उपकरणे बनवण्यात येत आहेत.

प्रसादात वेलचीचे दाणे दिले जाणार !

प्राणप्रतिष्ठेच्या वेळी येणार्‍या देशभरातील ८ सहस्र मान्यवरांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या वेळी वेलचीच्या दाण्यांचा प्रसाद मिळणार आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने यासाठी ५ लाख पाकिटांची मागणी दिली आहे. दुसरीकडे, प्राणप्रतिष्ठेच्या महाप्रसादासाठी मेहंदीपूर बालाजी येथून २ लाख लाडूची पाकिटे पाठवली जाणार आहेत.

छत्तीसगड सरकारने २२ जानेवारी मद्यबंदी दिवस केला घोषित !

छत्तीसगडमध्ये २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा दिनी मद्यबंदी (ड्राय डे) असणार आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.