ISIS Module Maharashtra : आतंकवाद्याने सीरियास्थित संस्थेला पैसा पुरवल्याचे उघड !

  • महाराष्ट्रातील ‘इसिस’च्या आतंकवादी ‘मॉड्युल’विषयी आरोपपत्र प्रविष्ट केल्याचे प्रकरण

  • आतंकवाद्यांनी ‘पडघा’ गावाला ‘भारतातील ग्रेटर सीरिया’ संबोधल्याचाही उल्लेख !

मुंबई – आतंकवादी शर्जिल शेख याने त्याचे कोटक महिंद्रा बँक खाते वापरून सीरियास्थित ‘द मर्सिफुल हँड्स’ या संस्थेला पैसे पाठवले होते, तसेच झुल्फिकार अली बडोदावाला याच्या दृष्टीने पडघा गाव हे भारतातील ‘अल् शाम’ (ग्रेटर सीरिया) होते, अशा अनेक धक्कादायक गोष्टी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रातून उघड झाल्या आहेत. महाराष्ट्रातील ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवादी ‘मॉड्युल’विषयी हे आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले होते.

१. अन्वेषण यंत्रणेला आतंकवादी शर्जिल शेखच्या भ्रमणभाषमध्ये अनेक व्हिडिओ सापडले. यातून त्याचा आतंकवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे भक्कम पुरावे मिळाले आहेत.

२. या व्हिडिओमध्ये इस्लामिक स्टेटचा झेंडा दिसत असून गोळीबार करणे, सीरियामध्ये मास्क घालून फिरणे, पाकिस्तान आणि सीरिया येथील भाषणे सापडली आहेत. आरोपीकडून मोठ्या प्रमाणात ‘व्हीपीएन् नेटवर्क’चा वापर केला जात होता. इसिसच्या आतंकवाद्यांकडून एका व्यक्तीचा गळा चिरण्याचा व्हिडिओही त्यात सापडला.

३. ‘व्हॉइस ऑफ हिंद’ची ‘प्रचार पत्रिका’ आणि इतर जिहादी कागदपत्रेही भ्रमणभाषमध्ये सापडली आहेत.

४. यासह देशाबाहेर मुसलमानांच्या होणार्‍या हत्या, खिलाफत आणि इतर संघटनांच्या पत्रिका अशी कागदपत्रेही सापडली आहेत. आरोपी तबीश सिद्दीकी आणि बरोदावाला यांनी ‘बयाथ’ (संघटनेसाठी एकनिष्ठ रहाण्याची शपथ) घेतली होती.