संपादकीय : खरा विश्व ग्रंथ ‘भगवद्गीता’च !

वास्तविक पहाता ‘भगवद्गीता’ ही जगातील कुठल्याही पंथांच्या लोकांनी, विद्यार्थी, गृहस्थाश्रमी, संन्यासी, कर्मयोगी, ज्ञानयोगी यांनी वाचली, तरी त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात, इतकी ती थोर आहे. नुकतीच ‘गीता जयंती’ साजरी करण्यात आली. भगवद्गीतेच्या जन्माला ५ सहस्र १६८ वर्षे पूर्ण झाली आहेत. अशी गीता महान असतांना दुसरीकडे २३ एप्रिल हा ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. विल्यम शेक्सपियर, मिग्युअल सर्वांटीस, इंका गार्सिलोसो या ख्यातनाम लेखकांचा या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी ‘युनेस्को’ने ‘२३ एप्रिल’ हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून घोषित केला. ‘नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, जगभरातील लेखक आणि पुस्तके यांचा सन्मान करणे, हे या दिवसाचे खास उद्दिष्ट आहे’, असे समजले जाते. तसे पाहिले, तर शेक्सपियरच्या पुस्तकातून भौतिक सुखांची माहिती मिळते; मात्र सहस्रो वर्षे आधी श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. भारतामध्ये महाकवी कालिदासांसारखे महान नाटककार होऊन गेलेले आहेत; मात्र इंग्रजांचे अनेक देशांमध्ये राज्य असल्याने साहजिकच त्यांचा डंका सर्वत्र वाजत आलेला आहे. त्यामुळे त्यांना अनेक गोष्टींमध्ये असे वाटते की, ही गोष्ट आमच्याकडे प्रथमच झालेली आहे. तीच कथा या विश्व ग्रंथ दिवसाची आहे.

गीतेतूनच शाश्वत मार्ग

ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस ‘गीता जयंती’ म्हणून ओळखला जातो. तो दिवस म्हणजे भारतीय जीवनात श्रेष्ठतम म्हणावा लागेल. विश्वातील लोक भावपूर्ण अंतःकरणाने गीता जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी भक्तीभावाने साजरा करतात. एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे, ही कदाचित् अखिल विश्वात गीतेची आगळीवेगळी विशेषता आणि महानता प्रकर्षाने दिसून येते. गीतारूपी अमृत भगवंताने धनुर्धर अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले आहे. जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रत्येक विचार गीतेत आहे. यासाठीच गीता हा धर्मज्ञानाचा कोष आहे. सहस्रो वर्षांपासून ते आजपर्यंत ऋषी, साधू-संत, भक्त, चिंतक, योगी, कर्मवीर, ज्ञानी मग तो कोणत्याही देशातील वा भूप्रदेशातील असो; कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा असो, त्या सर्वांना गीतेतील अवीट माधुर्याने आणि सौंदर्याने मुग्ध केले आहे. गीतेने मानव समाजाला जगण्याचे धाडस आणि तेज दिले. जीवनाचा पुरुषार्थ दाखवला. गीतेने मनुष्यमात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखवला आहे. गीता म्हणजे भारताच्या गौरवाचा मानबिंदू आहे. गीता जगाकडे आणि जीवन मार्गाकडे पहाण्याची मूलभूत अध्यात्माची दृष्टी देणारा ग्रंथ आहे. आपल्या प्राणप्रिय देशाच्या स्वातंत्र्यासाठी झुंजलेले वीर, क्रांतीकारक, देशभक्त हे गीता हृदयाशी धरून फासावर चढले. याचाच अर्थ असा की, मृत्यूलाही हसतमुखाने सामोरे जाण्याचे आत्मिक आणि मानसिक बळ गीतेने दिले. लोकमान्य टिळक, योगी अरविंद या थोर राष्ट्रीय नेत्यांनी गीतेवर चिंतन केले आहे. अशा गीतेतील सर्व ज्ञान परदेशातील वरील साहित्यिक आणि लेखक यांच्या पुस्तकातून मिळत नाही. तेथे केवळ मानवी सुख आणि भौतिक गोष्टींचा ऊहापोह अधिक असतो.

‘गीता जयंती’चे आयोजन

आजची सामाजिक माध्यमे आणि संकेतस्थळाच्या युगात पुस्तके वाचण्याचे प्रमाण दिवसेंदिवस न्यून होत चालले आहे. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी न्यून होत आहे. साहित्य संमेलनामध्ये पुस्तकांची विक्री न्यून होऊ लागली आहे. पूर्वी गजबजणारी वाचनालये आता ओस पडू लागली आहेत. ग्रंथालयातील पुस्तके वर्षानुवर्षे एका जागेवरून हलत नाहीत. आजची पिढी सामाजिक माध्यमांच्या आहारी गेल्याने पुस्तकांपासून दूर होत चालली आहे. सामाजिक माध्यमांमुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ‘वर्ल्ड बुक डे’ साजरा करण्याऐवजी ‘गीता जयंती’सारख्या उपक्रमांचे आयोजन सर्वत्र व्हायला हवे.

‘गीता जयंती’ हाच ‘जागतिक ग्रंथ दिवस’ !

असा हा गीता ग्रंथ आपल्या देशात निर्माण झाला, तोही त्या वेळेस जेव्हा आजचे विश्वातील प्रगत देश अस्तित्वातच नव्हते. आमच्याकडे मानव कल्याणासाठी असलेल्या ज्ञानाचे हे भांडार आम्ही देशातील हिंदूंना आणि त्यानंतर जगाला देण्याची आवश्यकता आहे. अनेक साधू-संत हे कार्य करत असतात; परंतु आज आमचे विद्यार्थी फाडफाड इंग्रजी बोलू शकतात. अनेक विद्यार्थी जर्मन, जपानी, फ्रेंच इत्यादी भाषांचा अभ्यास करतात. एकेकाळी जगातील विद्वान भारतात येऊन विविध ग्रंथांचा अभ्यास करायचे. त्यासाठी त्यांना संस्कृत भाषा शिकावी लागायची. संस्कृत ही देवभाषा असून ती आम्ही शिकली पाहिजे आणि इतरांनाही शिकवली पाहिजे. भगवद्गीता हा आमचा ग्रंथ आहे. तो शिकून, त्याचे आचरण करून तो इतरांना शिकवला पाहिजे. भारतातील ८० कोटी हिंदु लोक जर भगवद्गीता शिकले, तर संपूर्ण जगच भगवद्गीता शिकेल आणि ‘कृण्वन्तो विश्वमार्यम’ (संपूर्ण जगाला आर्य (सुसंस्कृत) करायचे आहे), ही आमच्या पूर्वजांची घोषणा सार्थक ठरेल. असे होण्यासाठी केंद्र सरकारने ‘गीता जयंती’ या दिवसाला ‘जागतिक पुस्तक दिन’, ‘राष्ट्रीय ग्रंथ दिवस’ आणि ‘जागतिक ग्रंथ दिवस’ म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

‘गीता जयंती’ हा ‘राष्ट्रीय ग्रंथ दिवस’ किंवा ‘जागतिक ग्रंथ दिवस’ म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !