ब्रह्मातील आनंदाचे स्वरूप

।। श्रीकृष्णाय नमः ।।

पू. अनंत आठवले

‘तैत्तिरीय उपनिषद्’मध्ये ब्रह्माचे स्वरूप ‘सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म’(वल्ली २ अनुवाक १ मन्त्र १) असे सांगितले आहे. ह्याचा अर्थ आहे ‘अस्तित्व, ज्ञान, आणि अनंतत्व हे ब्रह्म (ब्रह्माचे स्वरूप) आहे. ह्यातील अस्तित्व, ज्ञान, आणि अनंत ह्या प्रत्येक शब्दाने व्यक्त होणारे स्वरूप समजण्यात अडचण आली नाही. पण पुढे त्याच वल्लीच्या अनुवाक ७,८,९ मध्ये ब्रह्माच्या आनंदाविषयी लिहीले आहे. ‘आह्निकतत्त्व’ मध्येही ‘सच्चिदानन्द’ असा ब्रह्माचा उल्लेख आहे. सत्, चित् तर कळले होते, पण ब्रह्माच्या ‘आनंद’ ह्या स्वरूपाचे आकलन मात्र झाले नाही.

तैत्तिरीय उपनिषद्मध्ये सांगितले आहे ‘रसो वै स:।’ २-७-१

अर्थ- तो परमात्मा नक्की रसच आहे. आद्य शंकराचार्यांनी ह्यावरील भाष्यात लिहीले आहे ‘आंबट-गोड इत्यादी तृप्तीदायक आणि आनंददायक  पदार्थ लोकांमध्ये ‘रस’ नावाने प्रसिद्ध आहेतच. हा रस मिळाल्याने मनुष्य आनंदी म्हणजे सुखी होतो. ब्रह्मनिष्ठ, इच्छारहित आणि निरपेक्ष विद्वान् बाह्यसुखाच्या साधनाने रहित असूनसुद्धा बाह्य रस मिळून आनंदित झाल्यासारखे आनंदयुक्त असलेले पाहण्यात येतात. नक्कीच त्यांना येणारा रस ब्रह्मच आहे. रसाने येण्यासारख्या त्यांच्या आनंदाचे कारण ते ब्रह्मच आहे.’

लौकिक आनंदसुद्धा ब्रह्मानंदाचाच अंश असतो, पण तो बाह्य विषयांवर अवलंबून असतो. इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून होणारे सुख, जसे नाकाला सुगंधाचा, कानाला मधुर संगीताचा, त्वचेला सुखद स्पर्शाचा, डोळ्यांना आकर्षक दृष्याचा आणि जिभेला रुचकर रसाचा होणारा आनंद हा बाह्य विषयांवर अवलंबून असतो. हे आनंद ब्रह्मानंदाचेच अंश असले तरी ते नित्य नाहीत. लौकिक आनंद आणि ब्रह्मानंदामधील भेद पुढे दिले आहेत.

संत तुकाराम महाराजांना ह्या ब्रह्मानंदाचा अनुभव आला होता आणि त्यांनी तो असा व्यक्त केला आहे –

१. तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरी या थारा आनंदाचा ।।

इथे तुकाराम महाराज सांगतात की आता बाहेरची जाणीव अंतरात येत नाही, अंतर आनंदाचे स्थान बनले आहे.

२. न झाला प्रपंच आहे परब्रह्म । अहंसोहं ब्रह्म आकळले ।।
तत्वमसि विद्या ब्रह्मानंदी सांग । तेचि झाला अंगे तुका आता ।।

तुकाराम महाराज म्हणतात की प्रपंच नाहीच, परब्रह्म आहे. मी ते ब्रह्मच आहे, ह्याचे आकलन झाले. ‘ ते ब्रह्म तूच आहेस’ ही सांगोपांग विद्या ब्रह्मानंदाविषयी आहे आणि तुकाराम आता स्वत:च ते झाला आहे.

पण तरीही ह्या लेखाच्या लेखकाच्या मनात प्रश्न राहिलाच की ब्रह्माच्या आनंदाचे स्वरूप काय आहे ? ह्या प्रश्नाने खूपच वर्षे सतावले. काही विद्वानांना आणि आध्यात्मिक संस्थांना हा प्रश्न पाठवला होता, पण ब्रह्मानंदाचे स्वरूप कळू शकले नाही.

ब्रह्माचे स्वरूप एकच असले तरी विशेष जाणकारांकडून ते वेगवेगळ्या शब्दांत व्यक्त केले जाते. ऋग्वेद सांगतो  ‘एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति’ १.१६४.४६

म्हणजे विशेष जाणकार एकच अस्तित्व वेगवेगळ्या शब्दात सांगतात. उदाहरणार्थ – संत एकनाथ महाराज ह्यांनी त्या ब्रह्मानंदाचे स्वरूप असे व्यक्त केले आहे –

तेवी जावोनिया अज्ञान । उरला जो ज्ञानाभिमान ।
तो ही त्यागिलिया जाण । चित्समाधान स्वानंदे ।। – एकनाथी भागवत १२-६०४

म्हणजे ब्रह्मज्ञान होऊन अज्ञान गेले आणि ते ज्ञान असल्याच्या जाणिवेचा सुद्धा त्याग केला की  स्वत:तल्या आनंदामुळे चित्ताचे समाधान होते.

ब्रह्मलीन स्वामी रामसुखदास ह्यांनी म्हटले आहे – जी सत्ता (अस्तित्व) आहे ते ‘सत्’ आहे, त्याचे जे ज्ञान आहे ते ‘चित्’(चैतन्य) आहे आणि त्यात जो दु:ख, संताप, विक्षेप ह्यांचा अत्यंत अभाव आहे, तो आनंद आहे.

पण तरीही आनंदाचे स्वरूप लेखकाला अवगत झाले नव्हते.

भगवान् श्रीकृष्णांनी सांगितले आहे-

तत्स्वयं —– कालेनात्मनि विन्दति ।। गीता अ. ४ श्र्लोक ३८

अर्थ- ते ज्ञान यथासमय स्वत: स्वत:तच प्राप्त करतो.

भगवान् श्रीकृष्णांच्या वरील सांगण्यानुसार, ह्या लेखाच्या लेखकाला यथासमय ब्रह्मानंदाचे स्वत:तच जसे आकलन झाले, ते पुढे दिले आहे-

१. अशुद्ध चित्तात ब्रह्माच्या स्वरूपाच्या ज्ञानाचा प्रकाश पडू शकत नाही. मनुष्य साधना करतो, ती चित्तशुद्धीसाठी असते. साधनेने चित्तशुद्धी झाली की मनुष्य कृतकृत्य होतो. जे करायचे ते केल्याचे समाधान मिळते.

२. मनुष्य आत्मज्ञानप्राप्तीसाठी अथक प्रयत्न करतो. अध्ययन, चिंतन-मनन इत्यादी करून आत्म्याचे, ब्रह्माचे, शाब्दिक ज्ञान होते. नंतर, शुद्ध चित्तात त्या आत्मज्ञानाचा स्पष्ट बोध होतो. मनुष्य ज्ञातज्ञातव्य होतो. जे जाणायचे ते जाणल्याचे समाधान मिळते.

३. जी प्राप्त करण्यासाठी मनुष्य चित्तशुद्धी करतो, आत्मज्ञानाच्या बोधाने जी प्राप्त होण्यासाठी ज्ञानसाधना करतो, ती ब्रह्माशी एकरूप होण्याची योग्यता ह्यानंतर प्राप्त होते. मनुष्य प्राप्तप्राप्तव्य होतो. जे प्राप्त करायचे ते प्राप्त झाल्याचे समाधान मिळते.

४. अशा रीतीने  कृतकृत्य, ज्ञातज्ञातव्य, प्राप्तप्राप्तव्य झाल्याने स्थायी समाधान होते. कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नसलेले हे स्थायी समाधान ब्रह्माच्या आनंदाचे स्वरूप आहे.

संबंधित अधिक माहिती –

१.- आत्मज्ञान झालेला, तुरीय (चौथ्या, महाकारण देहाच्या) स्थितीत असलेला, साक्षीभावात असलेला, ब्रह्मानंद अनुभवणारासुद्धा प्रारब्ध भोगणे बाकी असेपर्यंत देहात असतो आणि देहत्यागानंतर मोक्षप्राप्ती होते.

२.- तुरीय स्थितीच्या पुढे उन्मनी अवस्था असते जिच्यात देहभान नसते; अस्तित्व, ज्ञान,अनंतत्व आणि आनंदाच्या जाणिवेचे स्फुरण नसते. देहात असूनही मुक्त असतो. पण मोक्षासाठी उन्मनी अवस्था अपरिहार्य नाही. तुरीय स्थितीत असलेला सुद्धा देहत्यागानंतर मोक्ष प्राप्त करतोच.

इत्यलम् ।
अनंत आठवले ७.१२.२०२३

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।

पू. अनंत आठवले यांच्या लिखाणातील चैतन्य न्यून होऊ नये, यासाठी घेतलेली काळजी

लेखक पूजनीय अनंत आठवले (पूजनीय भाऊकाका) हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत.