Guinness World Record : गुजरातमध्ये एकाच वेळी ४ सहस्रांहून अधिक नागरिकांकडून सूर्यनमस्कार !

मेहसाना (गुजरात) – येथील मोढेरा सूर्य मंदिरासह १०८ ठिकाणी १ जानेवारी या दिवशी एकाच वेळी ४ सहस्रांहून अधिक नागरिकांनी सूर्यनमस्कार घालून ‘गिनिज बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नवा विक्रम नोंदवला. या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृहमंत्री हर्ष संघवी आणि ‘गिनिज बूक ऑफ रेकॉर्ड’चे निरीक्षक स्वप्निल डांगरीक उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ वरून स्वतः ही माहिती दिली. त्यात त्यांनी म्हटले की,  गुजरातने वर्ष २०२४ चे स्वागत एका विशेष पराक्रमाने केले आहे. १०८ ठिकाणी एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी सूर्यनमस्कार घालत ‘गिनिज बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद केली.

आपल्या संस्कृतीमध्ये ‘१०८’ या क्रमांकाला विशेष महत्त्व आहे. हा विश्‍वविक्रम घडला त्या प्रतिष्ठित स्थळांमध्ये मोढेरा येथील सूर्य मंदिराचाही समावेश होता.

तेथे सूर्यनमस्कार घालण्याच्या उपक्रमात अनेक लोक सहभागी झाले होते. योग आणि सांस्कृतिक वारशासाठी आपल्या वचनबद्धतेचा हा खरा पुरावा आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी सर्व नागरिकांना सूर्यनमस्कार स्वतःच्या दिनचर्येचा भाग बनवण्याचेही आवाहन केले.