ग्रामपंचायत, ग्रामस्थ अनभिज्ञ विरोध करण्याची खासदार विनायक राऊत यांची चेतावणी
कुडाळ : गेले काही दिवस तालुक्यातील वाशी, आंजिवडे या गावात अदानी आस्थापनाचा ८ सहस्र ३०० कोटी रुपयांच्या महाकाय हायड्रो वीजनिर्मिती प्रकल्पासाठी काम चालू असल्याची चर्चा चालू होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदार विनायक राऊत यांनी आंजीवडे गावात जाऊन याची माहिती घेतली, तसेच जिल्हा उपवनसंरक्षक यांच्याशी चर्चा केली. या वेळी ‘या प्रकल्पाविषयी ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत. त्यामुळे जनतेला अंधारात ठेवून येथे प्रकल्प करण्याचा प्रयत्न केल्यास प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू; मात्र अदानी यांना येथील भूमी देणार नाही’, अशी चेतावणी शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदार विनायक राऊत यांनी येथे दिली.
(सौजन्य : Lokshahi Marathi)
आंजिवडे गावात बी.एस्.एन्.एल्.चा मनोरा उभारण्यासाठी खासदार राऊत यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर येथील श्री सातेरीदेवी मंदिरात ग्रामस्थांनी खासदार राऊत यांचा सत्कार केला. या वेळी आंजिवडे येथे वीजनिर्मिती प्रकल्प होऊ घातल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांनी जिल्हा उपवनसंरक्षक एम्. नवकिशोर रेड्डी यांना बोलावले. या वेळी वीजनिर्मिती प्रकल्पाविषयी रेड्डी यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की, जानेवारी २०२३ मध्ये अदानी आस्थापनाने जिल्हा वन विभागाशी संपर्क साधून वाशी, आंजिवडे या भागात वीज प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्याची अनुमती मागितली होती. आस्थापनाला झाडे न तोडता आणि अन्य अटी घालून २० विंधन विहिरी (बोअरवेल्स्) खोदण्यासाठी अनुमती दिली आहे. सध्या सर्वेक्षण चालू आहे. त्यानंतर त्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवला जाईल. या प्रकल्पासाठी अदानी आस्थापनाला १८५ हेक्टर भूमी आवश्यक असून त्यांपैकी १६१ हेक्टर भूमी वन विभागाची उपलब्ध आहे. उर्वरित भूमी खासगी मालकांकडून घेण्यात येणार आहे.
(सौजन्य : ABP MAJHA)
रेड्डी यांनी दिलेल्या माहितीवरून ही गोष्ट स्पष्ट झाली की, आतापर्यंत गुप्तपणे जे काम चालू होते, ती वस्तूस्थिती होती. ‘एवढा मोठा प्रकल्प येथे प्रस्तावित असतांना आणि त्यासाठी कार्यवाहीही चालू असतांना एवढी गुप्तता पाळण्याची आवश्यकता काय ?’, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.