शंखवाळ (सांकवाळ, गोवा) येथील वारसा स्थळी अवैधरित्या ख्रिस्त्यांची जत्रा आणि तीर्थयात्रा !

  • हे वारसा स्थळ पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी आहे

  • पुरातत्व विभागाची अनुमती नसतांनाही धर्मांध ख्रिस्ती करत आहेत जत्रा आणि पदयात्रा यांचे आयोजन

श्री विजयदुर्गा माता, शंखवाळ-(सांकवाळ) गोवा

पणजी, २१ डिसेंबर (वार्ता.) : शंखवाळ (सांकवाळ) येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (सांकवाळचे प्रवेशद्वार) हे वारसा स्थळ (पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी) आहे. पुरातत्व विभागाच्या नियमानुसार वारसा स्थळाच्या १०० मीटरच्या अंतरात पुरातत्व विभागाचा ‘ना हरकत दाखला’ मिळवल्याविना कोणतीही कृती करता येत नाही; मात्र या ठिकाणी वर्ष २०१८ पासून प्रतिवर्ष ७ ते १६ जानेवारी या कालावधीत सेंट जोसेफ वाझ फेस्ताचे, तर वर्ष २०१९ पासून प्रतिवर्ष मार्च मासामध्ये ‘वॉकिंग पिलीग्रीमेज’चे (ख्रिस्त्यांच्या पायी तीर्थयात्रेचे) अवैधरित्या आयोजन केले जात आहे. माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार पुरातत्व खात्याच्या मते ‘वॉकिंग पिलीग्रीमेज’ ही ‘फ्रंटीस पी ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळावरील पारंपरिक धार्मिक प्रथा नाही; मात्र तरीही नियमांचे उल्लंघन करून ‘वॉकिंग पिलीग्रीमेज’ आणि ‘फेस्त’ (ख्रिस्त्यांची जत्रा) यांचे आयोजन केले जात आहे. यावर पुरातत्व विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. वर्ष २०२४ मध्ये जानेवारी मासात ‘फेस्त’ आणि मार्च मासात ‘वॉकिंग पिलीग्रीमेज’ यांचे अवैधरित्या आयोजन केले जाणार आहे. ‘फेस्त’ आणि ‘वॉकिंग पिलीग्रीमेज’ यांच्या आयोजनासाठी पोलीस संरक्षण, अग्नीशमन दल, रुग्णवाहिका सेवा आदी सर्व शासकीय सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. ‘करणी सेना’ यांनी गत मासात शंखवाळ येथील वारसा स्थळी अवैधरित्या ‘वॉकिंग पिलीग्रीमेज’ आणि ‘फेस्त’ यांचे आयोजन करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस दलाला केली होती; मात्र यासंबंधी कोणतीच कृती झालेली नाही.

पुरातत्व विभागाची ‘वॉकिंग पिलीग्रीमेज’ला अनुमती नसल्याची माहिती उघडकीस !

माहिती अधिकाराखाली पुरातत्व विभागाच्या संचालिका ब्लोसम मडेरा आणि सांकवाळ चर्चचे पाद्री कॅनेथ टेलीस यांच्यामधील फेब्रुवारी २०२२ मधील पत्रव्यवहाराची माहिती उपलब्ध झाली आहे. यामध्ये पाद्री कॅनेथ टेलीस १८ फेब्रुवारी २०२२ या दिवशी पुरातत्व खात्याकडे ६ मार्च २०२२ या दिवशी ‘वॉकिंग पिलीग्रीमेज’साठी अनुमती मागत आहे. यावर पुरातत्व खात्याच्या संचालिका ब्लॉसम मडेरा म्हणतात,‘‘वॉकिंग पिलीग्रीमेज’ ही या ठिकाणची पारंपरिक धार्मिक कृती नाही आणि वारसा स्थळी नियमानुसार अनुमती देता येत नाही.’’ पुरातत्व खात्याची अनुमती नसतांनाही या ठिकाणी ‘वॉकिंग पिलीग्रीमेज’चे आयोजन केले गेले आणि वर्ष २०१९ पासून हा प्रकार येथे चालू आहे.

_______________________________

शंखवाळ येथील ‘फेस्ता’च्या आयोजनासाठी कायदा आणि सुव्यवस्थेसंबंधी बैठक

शंखवाळ : येथील ‘फेस्त’ आणि झुवारीनगर येथील जत्रा यांच्या आयोजनाला अनुसरून कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी कुठ्ठाळीचे स्थानिक आमदार आंतोन वाझ यांनी शासकीय अधिकारी आणि पोलीस यांच्यासमवेत नुकतीच बैठक घेतली आहे.

सांकवाळ येथील वारसा स्थळी श्री विजयादुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना करण्याची भक्तांची मागणी

पोलिसांनी कारवाई करून नेलेली ही श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती

ऑगस्ट २०२३ मध्ये वारसा स्थळी श्री विजयादुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून ही मूर्ती तेथून नेली. या घटनेनंतर पाद्री कॅनेथ टेलीस आणि इतर यांनी वारसा स्थळी अनधिकृतपणे प्रवेश करून एका कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळी धार्मिक तणाव निर्माण करणारी भाषणे देण्यात आली. पोलिसांनी वारसा स्थळी श्री विजयादुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केल्याच्या प्रकरणी दोघांवर कारवाई आरंभली; मात्र दुसर्‍या गटावर आजतागायत कोणतीच कारवाई केलेली नाही. सरकार पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचा जीर्णोद्वार करण्याची मोहीम आरंभली आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने  सांकवाळ येथील वारसा स्थळी श्री विजयादुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना करावी, अशी मागणी देवीच्या भक्तांकडून होत आहे.

संपादकीय भूमिका

धर्मांध ख्रिस्त्यांसमोर नांगी टाकणारा पुरातत्व विभाग विसर्जित करणे आवश्यक !

हे ही वाचा –

शंखवाळ (सांकवाळ) येथे वारसा स्थळी चर्च संस्थेने अनधिकृतपणे फेस्ताचे (जत्रेचे) आयोजन केल्याचे उघड
https://sanatanprabhat.org/marathi/682902.html