साधना करून वास्तूदोषांचा हानीकारक प्रभाव न्यून करा ! – राज कर्वे, ज्योतिष विशारद आणि वास्तूशास्त्र अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

  • महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आगरतळा (त्रिपुरा) येथे वास्तूशास्त्रविषयक संशोधन ‘ऑनलाईन’ सादर !

  • महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे मार्गदर्शक, तर श्री. राज कर्वे हे आहेत लेखक !

श्री. राज कर्वे

फोंडा (गोवा) – ज्याप्रमाणे वास्तूचा परिणाम व्यक्तीवर होतो, त्याचप्रमाणे व्यक्तीचाही परिणाम वास्तूवर होत असतो. साधना करणार्‍या व्यक्तीचा सकारात्मक परिणाम वास्तूवर होऊन वास्तूदोषांचा हानीकारक प्रभाव न्यून होतो, असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे ज्योतिष विशारद आणि वास्तूशास्त्र अभ्यासक श्री. राज कर्वे यांनी केले. ‘केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, एकलव्य कॅम्पस, आगरतळा, त्रिपुरा’ यांनी १ आणि २ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रत्यक्ष अन् ‘ऑनलाईन’ पद्धतीने आयोजित केलेल्या ‘नॅशनल सेमिनार ऑन कॉन्ट्रिब्युशन ऑफ वास्तूशास्त्र इन मॉडर्न कन्टेक्स्ट’ या परिषदेत श्री. राज कर्वे ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते. त्यांनी ‘वास्तूशास्त्रानुसार वास्तू-निर्मिती करण्याचे लाभ, तसेच वास्तूदोषांच्या निवारणासाठी सुलभ आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या जोडीला ‘साधना’ करण्याचे महत्त्व !’, हा शोधनिबंध सादर केला. या शोधनिबंधाचे मार्गदर्शक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे असून, लेखक श्री. राज कर्वे हे आहेत.

श्री. राज कर्वे यांनी मांडलेली सूत्रे

१. वास्तूशास्त्रानुसार घराचे प्रवेशद्वार योग्य दिशेतील योग्य पदात (जागेत) असणे महत्त्वाचे असते. ‘प्रवेशद्वार योग्य पदात असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा आणि प्रवेशद्वार निषिद्ध पदात असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते’, हे ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) या भूतपूर्व अणुवैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी विकसित केलेल्या वैज्ञानिक उपकरणाचा वापर करून केलेल्या प्रयोगातून दिसून आले. थोडक्यात वास्तूशास्त्रानुसार घर बांधल्याने घरात सकारात्मक स्पंदने निर्माण होऊन व्यक्तीला सुख आणि शांती प्राप्त होते.

२. सध्या बहुतांश घरे वास्तूशास्त्रानुसार नसतात. त्यामुळे वास्तूतील ऊर्जा असंतुलित होऊन त्यात रहाणार्‍या सदस्यांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी वास्तूतील ऊर्जा संतुलित करण्यासाठी वास्तूत ‘रत्नसंस्कार’ केला जातो. रत्नसंस्कार, म्हणजे वास्तूमध्ये विशिष्ट दिशेत विशिष्ट रत्ने भूमीत पुरणे. ‘रत्नसंस्कार केल्यामुळे वास्तूतील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते’, असे ‘यू.ए.एस्.’ वापरून केलेल्या प्रयोगातून दिसून आले.

३. आपली वास्तू ही वास्तूशास्त्रानुसार असली किंवा आपण वास्तूदोष दूर करण्यासाठी ‘रत्नसंस्कार’सारखे उपाय केले असले, तरी वास्तूत निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा टिकून रहाण्यासाठी वास्तूची प्रतिदिन शुद्धी करणे आवश्यक आहे. ‘सात्त्विक उदबत्तीने शुद्धी करणे, धूप दाखवणे, गोमूत्र शिंपडणे, कडुनिंबाची धुरी दाखवणे, घरात संतांच्या आवाजातील भजने अथवा देवतांचा नामजप लावणे’, इत्यादी वास्तूशुद्धीचे काही सुलभ उपाय आहेत.

४. ज्याप्रमाणे वास्तूचा परिणाम व्यक्तीवर होतो, त्याचप्रमाणे व्यक्तीचाही परिणाम वास्तूवर होत असतो. व्यक्तीमध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अधिक असल्यास तिच्याकडून अयोग्य आचरण होऊन वास्तूत नकारात्मक स्पंदने निर्माण होतात. याउलट व्यक्तीत चांगले गुण अधिक असल्यास तिच्याकडून योग्य आचरण होऊन वास्तूत सकारात्मक स्पंदने निर्माण होतात. साधनेमुळे व्यक्तीतील स्वभावदोष आणि अहं न्यून होऊन सद्गुण वाढतात, तसेच व्यक्तीतील रज आणि तम हे गुण न्यून होऊन तिच्यात सत्त्वगुण वाढतो. याचा शुभ परिणाम वास्तूवर होऊन ती सकारात्मक (सात्त्विक) बनते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संतांची वास्तू !

संत साधनारत असल्याने ते ज्या वास्तूत निवास करतात, ती वास्तू सात्त्विक होते. त्यामुळे संतांचे जन्मस्थान, निवासस्थान, त्यांनी वापरलेल्या वस्तू इत्यादी जतन करण्याची परंपरा भारतात आहे. यासाठी आद्यशंकराचार्य यांच्या केरळ येथील जन्मस्थानाचे ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे करण्यात आलेले संशोधन मांडण्यात आले.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.