Teens Social Media : किशोरवयीन मुलांकडून सामाजिक माध्यमांचा अधिकाधिक होत आहे वापर ! – प्यु रिसर्च सेंटर

वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘प्यू रिसर्च सेंटर’ने केलेल्या अभ्यासामध्ये किशोरवयीन मुले अधिकाधिक सामाजिक माध्यमांचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. सामाजिक माध्यमांच्या दुष्परिणामांची जाणीव असूनही असे होत असल्याचे यातून लक्षात आले आहे.

१. प्यू रिसर्च सेंटरने १३ ते १७ वयोगटातील १ सहस्र ४५३ किशोरवयीन मुलांचा अभ्यास केल्यावर असे दिसून आले की, साधारणतः ९३ टक्के किशोरवयीन मुले यू ट्यूब वापरतात. ६३ टक्के किशोरवयीन मुले ‘टिक टॉक’, ६० टक्के ‘स्नॅपचॅट’ आणि ५९ टक्के मुले ‘इन्स्टाग्राम’ वापरतात. मुलांमध्ये फेसबुकचा वापर करण्याचे प्रमाण वर्ष २०१४-१५ मध्ये ७१ टक्के होते. ते घसरून यावर्षी ३३ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. मुलांपेक्षा मुली टिक टॉक आणि स्नॅपचॅट यांवर अधिक सक्रीय असतात. अन्य माध्यमांचा वापर दोघेही सारखाच करतात.

२. सामाजिक माध्यमांच्या वापराखेरीज किशोरवयीन मुले किती वेळ ऑनलाईन रहातात म्हणजे इंटरनेटचा वापर करतात, याचीही पहाणी करण्यात आली. त्यात निम्मे किशोरवयीन म्हणाले की, ते दिवसातून ९ घंटे इंटरनेट वापरतात. वर्ष २०१४-१५ च्या अभ्यासापेक्षा हे दुप्पट आहे.

३. डिजिटल उपकरणांच्या वापरामध्येही वाढ झाली आहे. ९५ टक्के किशोरवयीन मुले स्मार्टफोन वापरतात, ९० टक्के मुले ‘लॅपटॉप’ किंवा संगणक वापरतात, ८३ टक्के ‘गेमिंग कन्सोल’ (डिजिटल खेळ खेळण्यासाठीचे यंत्र) वापरतात आणि ६५ टक्के ‘टॅब्लेट’ वापरतात.

संपादकीय भूमिका

आजचे युग सामाजिक माध्यमांचे असल्याने अशा प्रकारचा वापर होणे हे आश्‍चर्यजनक म्हणता येणार नसले, तरी ‘ते जीवनासाठी किती आवश्यक आहे ?’, ‘त्याचे दुष्परिणाम काय आहेत ?’, याचे शिक्षण या मुलांना कोण देणार ? आणि ‘त्यांना यांपासून परावृत्त कसे करणार ?’, हा प्रश्‍न आहे !