ओझर (जिल्हा पुणे) – अष्टविनायकांपैकी सातवा गणपति म्हणून प्रसिद्ध असलेले, भाविकांचे विघ्न दूर करणारा गणपति म्हणून प्रसिद्ध असलेले, नवसाला पावणारा गणपति म्हणून प्रसिद्ध असलेले देवस्थान, असे ओझरचे नाव प्रत्येक गणेशभक्ताच्या स्मरणात रहाते. राज्यात ज्या प्रकारे शेगाव येथील देवस्थानने भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा देऊन राज्यासाठी नव्हे, तर देशासाठी एक आदर्श निर्माण केला, त्याचप्रकारे भाविकांना केंद्रबिंदू ठेवून ओझर देवस्थाननेही अल्पावधीतच कीर्ती प्राप्त केली आहे. जर देवस्थान भाविक-भक्तांच्या कह्यात असेल, तर ते कशा प्रकारे उत्कृष्ट नियोजन करून सामान्य भाविकांना सेवा देऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ओझर आहे !
इथे आल्यावर येथील शिस्त, स्वच्छता प्रत्येकालाच भावते. प्रत्येक जण शांतपणे येथील चैतन्य अनुभवू शकतो. या संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराने देवस्थानचे अध्यक्ष श्री. गणेशभाऊ कवडे यांच्याशी वार्तालाप करून त्यांनी हे कसे साध्य केले, ते जाणून घेतले !
कोरोनाकाळाच्या अगोदर देवस्थानवर कर्ज, तर आज सक्षम आर्थिक स्थिती !
कोरोनाच्या कालावधीनंतर मला अध्यक्षपदाचे दायित्व मिळाले. ज्या दिवशी मी अध्यक्षपद स्वीकारले, त्या दिवशी ४५ लाख रुपये कर्ज होते आणि ३७ लाख रुपयांचे देणे ! गेल्या ४ वर्षांत यातून देवस्थान पूर्णत: बाहेर पडून आज सक्षम आर्थिक स्थितीत आहे. मी अध्यक्ष झाल्यावर सर्वप्रथम ‘अध्यक्ष’ म्हणून असणारी वेगळी आसंदी बाजूला केली. अध्यक्षांसह आम्हा प्रत्येक विश्वस्ताला आता एकच आसंदी आहे. आम्ही सर्व विश्वस्त श्री गणेशाची सेवा म्हणून हे कार्य करतो. आता सामान्यांसाठी बससेवेपासून अगदी हेलिकॉप्टरही आम्ही दर्शनासाठी उपलब्ध करून देतो. भाविकांनी २१ सहस्र रुपये दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावाने १० वर्षे येथे भोजन व्यवस्था चालू असते. त्यालाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
भक्तांना सर्व सुविधा मिळण्यासाठी आणि धार्मिकता जपण्यासाठी अखंड कार्यरत !
४० वर्षांत मी पहिला ‘श्री गणेश याग’ मंदिरात केला. यजमानांसाठी महाआरती, धूपारती, महिलांसाठी गंगाआरती उपलब्ध करून देण्यात आली. आलेल्या भाविकांची निवास व्यवस्था, भोजनव्यवस्था यांवर १०० टक्के लक्ष देऊन प्रत्येक भाविकाला श्री गणेशाचे दर्शन होईल, यावर लक्ष केंद्रीत केले. ओझर देवस्थानमध्ये कुठेही ‘व्ही.आय.पी.’ पास नाही. सर्वजण इथे समान आहेत. अगदी गाभार्यातही सर्वांना शांतपणे दर्शन घेता यावे, यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
भाविकांना आम्ही २ सहस्र ५०० रुपयांत अष्टविनायक दर्शन घडवून आणतो. यात ५० आसनांच्या गाडीत आम्ही ४५ भाविक घेतो, त्यात आमचे ५ सेवेकरी असतात. सकाळी ६ वाजता ओझर येथून बस निघते. रांजणगाव येथे दर्शन झाल्यानंतर आमची भोजन व्यवस्था असते, त्यानंतर मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक असा २ दिवसांचा प्रवास असतो. या बससेवला चांगला प्रतिसाद मिळत आहे. देवस्थानच्या परिसरात असलेली सर्व दुकाने बहुतांशकरून गावकर्यांची आहेत. त्यामुळे ते त्यांचे व्यापारीकरण न करता भाविकांना श्रद्धेनेच सेवा देतात. या गावाचे विशेष म्हणजे येथील बहुतांश निवडणुका या बिनविरोध होतात. येथे ज्येष्ठ-महिलांना मान दिला जातो, तसेच ज्येष्ठांच्या मतांचा सन्मान केला जातो.
‘बायोगॅस प्रकल्प’, फुलांपासून अगरबत्ती बनवण्याचा प्रकल्प या माध्यमातून देवस्थान स्वयंपूर्ण करण्याकडे वाटचाल !
या देवस्थानात कचर्यापासून खतनिर्मिती केली जाते. मोठ्या प्रमाणात साठलेला देवस्थानाचा ओला कचरा, परिसरात असणार्या उपगृहातील ओला कचरा यापासून ‘बायोगॅस’ची निर्मिती केली जाते. हार, फुले, दुर्वा यांसारख्या निर्माल्यापासून अगरबत्तीची निर्मिती केली जाते. तसेच नारळ फोडल्यानंतर त्याच्या कवट्या, नारळाची शेंडी यापासून ‘कोकोपीट’चे काम चालू आहे. नारळाच्या खोबर्यापासून तेलाची निर्मिती केली जात आहे. कचर्याचे १०० टक्के नियोजन केले जाते. प्रतिदिन अगदी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत इथे देवस्थान परिसरात स्वच्छता चालू असते.
घाट सुशोभिकरणासह संगीत विद्यालय लवकरच चालू करणार !
मंदिराच्या चारही बाजूने नदी आहे. त्यामुळे प्रथम घाट बांधणीचे नियोजन केले आहे. वाहनतळासाठी जागा अल्प असल्याने येथे आता ‘इलेक्ट्रॉनिक वाहनतळाचे’चे नियोजन करण्यात येणार आहे. ‘यु.पी.एस्.सी.’ आणि ‘एम्.पी.एस्.सी.’च्या मुलांसाठी ग्रंथालयाच्या नियोजनाचे काम चालू आहे. संगीत विद्यालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
हा भाग ग्रामीणबहुल असल्याने, तसेच नगर, संगमनेर, पुणे, कल्याण परिसरात ‘डायलिसीस’ केंद्र अतिशय अल्प आहेत, त्यामुळे रुग्णांसाठी साधारणत: १ मासाच्या आत आम्ही ओझर येथे ‘डायलिसिस सेंटर’ चालू करत आहोत. या कामासाठी भाविकांनी चांगले साहाय्य केले आहे.
भाविकांनी अर्पण म्हणून दिलेल्या धनाचा हिशोब प्रतिदिन ‘डिजिटल बोर्ड’वर दाखवण्यात येतो !
भाविक जे धन देतात त्यांतील पै अन् पै धर्मकार्यासाठी व्यय होणे अपेक्षित असते. त्यामुळे भाविकांनी अर्पण केलेल्या धनाचा हिशोब आम्ही देवस्थानच्या बाहेर ‘डिजिटल बोर्ड’वर दाखवतो. यामुळे भाविकांच्या मनातील देवस्थानप्रतीची आस्था वाढण्यास साहाय्य होते. अशाप्रकारे प्रतिदिन दैनंदिन खर्च मांडणारे एकमेव देवस्थान असेल. यामुळे आमच्याकडे येणार्या देणगीत वाढच झाली आहे.
– श्री. अजय केळकर, वार्ताहर, दैनिक सनातन प्रभात, कोल्हापूर.
हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचा सेवा भाव वाखाणण्याजोगा !श्री क्षेत्र ओझर येथे दोन दिवसीय द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ पार पडली. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांची तळमळ, चिकाटी, नियोजनकौशल्य यांसारखे अनेक गुण वाखाणण्याजोगे आहेत. गेल्या ५ दिवसांपासून समितीच्या कार्यकर्त्यांनी जी सेवा केली ती पाहून आम्ही सर्व विश्वस्त, कर्मचारी भारावून गेलो आहोत. येथे उपस्थित राहिलेले ६५० हून अधिक विश्वस्त, प्रतिनिधीही आता आमच्याशी जोडले गेले आहेत. आता हे धर्मकार्य आपल्याला संयुक्तपणे पुढे न्यायचे आहे ! – श्री. अजय केळकर, वार्ताहर, दैनिक सनातन प्रभात, कोल्हापूर. |