हिंदु धर्म समजून न घेतल्यास अनेक ‘श्रद्धां’ना ‘लव्ह जिहाद’चा सामना करावा लागेल !

प्रत्येक धर्माची किंवा पंथाची एक वेगळी संस्कृती असते. त्याप्रमाणे त्या समाजाच्या घटकांवर तसतसे संस्कार होत असतात. अगदी लहानपणापासून या संस्कारांतून व्यक्तीची जडणघडण होत असते. मग ते संस्कार समाजाच्या दृष्टीने योग्य असोत किंवा अयोग्य. त्या व्यक्तीला ते योग्यच वाटत असतात; कारण अगदी बाल्यावस्थेतून तो तेच अनुभवत आलेला असतो. आजकाल ‘लव्ह-जिहाद’चे अनेक प्रकार वारंवार उघडकीस येतांना दिसत आहेत. या प्रकारांचा प्रारंभ अगदी मोगल भारतात आल्यापासूनचा आहे. याची अनेक उदाहरणे सापडतील; परंतु त्या वेळी ‘लव्ह-जिहाद’ हे ‘लेबल’ लावले जात नव्हते, एवढाच काय तो फरक. आजच्या तरुण आणि सुशिक्षित मुली अशा प्रकारांमध्ये फसण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याचाच वेध घेणारा हा लेख !

प्रतिकात्मक छायाचित्र

१. ‘कॉन्व्हेंट स्कूल’मुळे मुलांवर पाश्चात्त्य विकृतीचा प्रभाव

‘कॉन्व्हेंट स्कूल’मधून शिक्षण घेणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. ‘कॉन्व्हेंट स्कूल’ आणि हिंदु संस्कृती यांचा दूर दूरपर्यंत संबंध नाही. त्यामुळे नकळत मुलांवर पाश्चात्त्य विकृतीचा प्रभाव पडतो आणि ‘हिंदु संस्कृती म्हणजे मागासलेले विचार’, असा त्यांचा समज होतो अन् हीच खरी धोक्याची घंटा. प्रारंभ येथून होतो. अशा मुलांना घरातील व्यक्तींनी देवाची पूजा करायला सांगितली, तर त्यांना वैताग येतो. अशी परिस्थिती मुलांची व्हायला पालकच उत्तरदायी असावेत, असे वाटते; कारण ना कधी स्वत:चा धर्म समजून घेतला, ना संस्कृती जाणून घेतली, तर मग मुलांना काय संस्कार देणार ?

श्री. गजानन सातार्डेकर

२. लव्ह जिहादची समस्या सोडवण्यासाठी हिंदु संस्कृतीचे आचरण आवश्यक !

कट्टरवादी मुसलमान समाजात जसे संस्कार झाले असतील, ते तसेच वागणार ! मग आपल्यावर आपल्या सनातन हिंदु धर्माचे संस्कार झाले असते, तर अशा विरुद्ध विचारसरणीच्या समाजातील घटकांच्या संपर्कात येण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. अर्थात्  अशा ‘लव्ह जिहाद’सारख्या समस्याच उद्भवल्या नसत्या. आवश्यकता आहे ती आपल्या संस्कृतीचे आचरण करण्याची ! पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी देहली येथील श्रद्धा वालकर हिच्या हत्येच्या अनुषंगाने ‘लव्ह जिहाद’ प्रकरणावर अगदी एका वाक्यात सुंदर संदेश दिला आहे, तो म्हणजे ‘टिकलीवर श्रद्धा असती, तर श्रद्धा टिकली असती !’

थोडक्यात धर्माचरणाच्या अभावामुळेच असे प्रकार घडतात, असे गुरुजींना सांगायचे होते. धर्माचे आचरण करणार्‍या हिंदु स्त्रियांकडे वाकड्या नजरेने नुसते बघण्याचे धाडससुद्धा या नराधमांना होणार नाही, एवढे सामर्थ्य हिंदु धर्मामध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये आहे; परंतु आधुनिकतेच्या नावाखाली हिंदु स्त्रियांनी स्वरक्षणासाठी धर्माने दिलेली आभूषणे एकेक करून काढली अन् त्यामुळे आजची स्त्री ‘विद्रुपीकरणा’कडे जातांना दिसत आहे.

३. आजच्या पिढीला धर्म न सांगितल्याने ती भरकटणे

प्रारंभी कुंकू होते, त्याची जागा ‘टिकली’ने घेतली. नंतर ‘मॅचिंग’च्या नावाखाली टिकलीचे रंग पालटायला लागले. हळूहळू टिकलीचा आकार पालटायला लागला आणि आजच्या पिढीला टिकली लावणे अवघड वाटू लागले. बघा केवळ टिकली हा मुद्दा घेतला, तर ही टिकली जाणीवपूर्वक चित्रपट आणि मालिका यांच्या माध्यमांतून स्त्रियांच्या कपाळावरून कधी गायब झाली, हे कळले सुद्धा नाही. हिंदु स्त्रियांच्या वेशभूषेवर बोलतच नाही. पूर्वी चोळी (ब्लाऊज) कशी होती ? आणि आता आजचा ‘ब्लाऊज’ कसा आहे, याचा तुम्हीच विचार करा ! ही विकृती नाही का ? असा पालट मुसलमान स्त्रियांमध्ये का होत नाही ? मुसलमान पुरुष त्यांचा पारंपरिक लेंगा-कुर्ता पोषाख अजूनही ‘दिमाखात’ घालतात, तर मग आमच्याच विषयी असे का ? कारण आपल्याला आपला धर्म ना कुणी सांगितला ! ना शिकवला गेला ! त्यामुळे आपली आजची पिढी भरकटत चालली आहे. तरुण व्यसनाधिनतेकडे आणि तरुणी ‘लव्ह जिहाद’मध्ये फसत आहेत.

४. धर्मशिक्षण घेण्यासाठी हवी इच्छाशक्ती !

हिंदु धर्मापासून दूर गेल्यानेच धर्मावर सध्या विविध माध्यमांतून आक्रमणे होत आहेत. यातीलच एक आक्रमण, म्हणजे ‘लव्ह जिहाद’ होय ! श्रद्धा वालकर हिच्या मृत्यूचे प्रकरण सर्वत्र गाजले. अनेक ठिकाणी याचा विविध माध्यमांतून निषेधही व्यक्त केला गेला; परंतु हे सर्व का घडत आहे ? तर हिंदूंना धर्मशिक्षण नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडून धर्माचरण होत नाही. अन्य धर्मीय जसे आपल्या धर्माविषयी सजग आणि शिक्षित असतात, तसे हिंदूंविषयी होतांना दिसत नाही. ही स्थिती पालटून हिंदु धर्मशिक्षित व्हावेत अन् धर्माचे रक्षण व्हावे, यासाठी सनातन संस्था गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. सनातन संस्था आणि तिचे साधक आपल्या हिंदु बांधवांना धर्म समजावा, यासाठी विनामूल्य अन् तुम्हाला हव्या त्या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर आहेत. आवश्यकता आहे ती आपल्या इच्छाशक्तीची ! आपला धर्म समजून घ्या अन्यथा यापुढेही अशा अनेक ‘श्रद्धां’ना ‘लव्ह जिहाद’चा सामना करावा लागेल.

– श्री. गजानन सातार्डेकर, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.