उस्ताद झाकीर हुसेन यांच्याशी माझी ओळख वर्ष १९६८ मध्ये माहीम येथील ‘टायपिंग क्लास’मध्ये (टाईपरायटरवर टायपिंग शिकणे) झाली. मी तेथे टायपिंग, ‘शॉर्टहँड’ (लघुलिपी) शिकून इतरांना टायपिंगही शिकवायचे. त्या वेळी झाकीर हुसेन हे तेथे टायपिंग शिकायला यायचे. त्यांचे व्यक्तीमत्त्व असे होते की, ते सर्वांना आपलेसे करायचे. त्यांचा स्वभाव खेळकर आणि पुष्कळ विनोदी होता. सर्वांशी मिळून मिसळून वागायचे. आमचा ५-६ मित्र-मैत्रिणींचा गट होता. आम्ही कुठे बाहेर गेलो की, ते लहान मुलासारखे खोड्या काढायचे. उदाहरणार्थ एखाद्या उपाहारगृहात गेलो की, जी वस्तू नाही तेच ते मागायचे. त्यांनी त्यांच्या वडिलांकडून उस्ताद अल्लारखांकडून लहानपणापासून तबल्याचे शिक्षण घेतले. शाळेच्या वा शिकवणीच्या कार्यक्रमात झाकीर यांचे तबलावादन असायचे. मी मुंबईतील श्री. परबगुरुजी यांच्याकडून ४ वर्षे कथ्थकचे शिक्षण घेतले आहे. एकदा त्यांनी माझ्या नृत्य कार्यक्रमात तबलावादन केले आहे. त्यांनी केलेले वादन अजून माझ्या मनात आहे.

अनेक वर्षांनी उस्ताद झाकीर यांनी भेटीच्या वेळी ओळखणे आणि त्या वेळी अहं न्यून असल्याचे जाणवणे
नंतर जवळजवळ २५ वर्षांनी माझी त्यांची भेट सोलापूरला झाली. मी आणि माझे पती (कै.) सुबोध नवलकर आम्ही दोघे तुळजापूर आणि अक्कलकोट येथे एका हॉटेलमध्ये मुक्कामाला होतो. सकाळी आम्ही न्याहारीसाठी एका उपाहारगृहामध्ये बसलो असता काही टेबल सोडून झाकीर हे त्यांच्या लोकांसमवेत बसले होते. आदल्या दिवशी रात्री सोलापूरमध्ये त्यांचा कार्यक्रम झाला होता. झाकीर यांनी मला पाहिले आणि ते माझ्याकडे येऊन माझ्या जुन्या नावाने ‘नीलिमा, अरे निली तू इधर है ?’, असे विचारले. मला आणि माझ्या पतींना आश्चर्य वाटले. त्यांनी मला एवढ्या वर्षांनंतर ओळखले. मी त्यांना म्हटले, ‘काल मला तुझ्या कार्यक्रमात येऊन भेटावेसे वाटले; परंतु तू व्यस्त असशील. मला ओळखशील कि नाही ?, असे वाटले.’ त्या वेळी ते म्हणाले, ‘मी तुला असा कसा विसरीन. तू माझी शिक्षिका होतीस. मला टायपिंग शिकवले. आपण चांगले मित्र आहोत.’ हे ऐकून मला आश्चर्य वाटले. ते एवढे प्रसिद्ध कलाकार होऊनही त्यांच्यामध्ये जरासुद्धा अहं नव्हता.
झाकीर हुसेन यांची हिंदु देवतांवर पुष्कळ श्रद्धा असणे
आमच्या वांद्रे येथील निवासस्थानी गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेशमूर्तीची स्थापना केली जायची. त्या वेळी पद्मभूषण प्रसिद्ध सतारवादक उस्ताद अब्दुल हालीम जफार खान यांनी सतारवादन आणि झाकीर यांनी तबलावादन केले. झाकीर यांची देवावर पुष्कळ श्रद्धा होती. उस्ताद झाकीर आणि उस्ताद अब्दुल हालीम जफार खान यांनी तबलावादन करण्यापूर्वी श्री सरस्वतीदेवी आणि श्री गणेश यांना प्रार्थना केली अन् नंतर वादन केले. त्या वेळीही पुष्कळ छान वाटले.
झाकीर हे एक आदर्श, अहंमुक्त व्यक्तीमत्त्व होते. पुढे ते परदेशात गेल्यावर त्यांच्याशी पुन्हा संपर्क होऊ शकला नाही. १५ डिसेंबर २०२४ च्या रात्री १०.३० वाजता दूरचित्रवाहिनीवर बातम्या पहात असतांना झाकीर यांच्या निधनाची बातमी ऐकून मी सुन्न झाले. माझा एक चांगला मित्र हरपला, याचे क्षणभर वाईट वाटले; परंतु लगेच विचार आला, ‘झाकीर हे त्यांच्या तबलावादनाच्या माध्यमातून अमर रहाणार आहेत, याचे समाधान वाटले.’ ‘उस्ताद झाकीर हुसेन यांना सद़्गती लाभो’, हीच भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
– श्रीमती स्मिता नवलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.१२.२०२४)