दुष्‍प्रवृत्तीचा नाश !

प्रतीकात्मक चित्र

अलीकडच्‍या काही वर्षांत भारतात ‘स्‍मार्टफोन’ आणि ‘इंटरनेट’चा अवलंब करण्‍यात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे ‘मोबाईल वॉलेट’, ‘यूपीआय’ आणि ‘कार्ड पेमेंट’ यांसारख्‍या डिजिटल पेमेंट पद्धतींचा वापरही लक्षणीय वाढला आहे. त्‍याचाच परिपाक म्‍हणून कि काय, जानेवारी ते नोव्‍हेंबर २०२४ या कालावधीत मुंबईमध्‍ये सायबर फसवणुकीच्‍या ५५ सहस्र ७०७ तक्रारींची नोंद झाली. केवळ मुंबईतील सायबर फसवणुकीच्‍या घटनांच्‍या प्रमाणावरून संपूर्ण भारतात या गुन्‍ह्यांचे संकट कसे वाढत आहे, याची कल्‍पना निश्‍चितच येते. या घटनांमध्‍ये अशिक्षित किंवा सामान्‍य व्‍यक्‍तीच भरडली जाते, असे नाही, तर मोठमोठ्या आस्‍थापनांचे पदाधिकारी, सुशिक्षितही लुबाडले गेले आहेत. अधिकोषांंमध्‍ये केलेल्‍या गुंतवणुकीवर अनेकदा अधिकोषातील व्‍यवस्‍थापक, तसेच कर्मचारी यांनी डल्ला मारल्‍याचे वृत्त ऐकिवात आहे. आयकर विभागाच्‍या नियमानुसार घरामध्‍ये किती रोख रक्‍कम ठेवावी, याला बंधने आहेत. प्रसंगी आयकर विभाग आणि तत्‍सम विभाग यांच्‍याकडून कारवाई होण्‍याचीही भीती असते. प्रतिदिन होणार्‍या घरफोड्या, चोर्‍या यांची टांगती तलवार जनतेच्‍या मानेवर आहेच. डिजिटल व्‍यवहार करतांना ‘ए.टी.एम्.’ची सुविधा सरकारने दिली; परंतु ती यंत्रेही सुरक्षित नाहीत, हे दर्शवणार्‍या अनेक घटना सातत्‍याने घडतात. सामान्‍यांचे कष्‍टार्जित धन कुठेच सुरक्षित नाही. सरकार, प्रशासन, तसेच पोलीस ही गुन्‍हेगारी आटोक्‍यात आणण्‍यासाठी प्रयत्नरत आहेत; परंतु घडणार्‍या घटनांच्‍या तुलनेत हे प्रयत्न तोकडे आहेत.

सरकारने यावर काढलेल्‍या काही उपाययोजना वरवरच्‍या वाटतात. पोलिसांच्‍या कारवाईने काही प्रमाणात सायबर फसवणुकीतील गुन्‍हेगारांना शिक्षा होते; मात्र तितके पुरेसे नाही. कष्‍ट न करता विनासायास, अवैध मार्गांनी धन अर्जित करण्‍याची वृत्ती समाजामध्‍ये अधिक प्रमाणात बळावली आहे. त्‍यामुळे वेगवेगळ्‍या क्‍लृप्‍त्‍या काढून जनतेची आर्थिक फसवणूक करण्‍यात येते. लुबाडणे, चोरी करणे ही प्रवृत्ती समूळ नष्‍ट करणे अत्‍यावश्‍यक आहे. त्‍यासाठी जनतेला धर्मशिक्षण देऊन मनाची प्रवृत्ती पालटण्‍यासाठी उद्युक्‍त करणे आवश्‍यक आहे. मानवी जीवनाला अध्‍यात्‍म आणि उपासना यांची जोड दिल्‍यास परिस्‍थिती हाताळणे सहज शक्‍य होते. त्‍यातूनच मनुष्‍याची सद़्‍सद्विवेकबुद्धी जागृत होते. योग्‍य-अयोग्‍य यांची जाण उत्‍पन्‍न होऊन अवैध आणि गैरमार्गांचा वापर विनासायास बंद होतो. ‘जोडोनिया धन उत्तम व्‍यवहारे’, ही जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांनी दिलेली अध्‍यात्‍माची शिकवण जीवनात अंगीकारणे शक्‍य होते. यासाठीच वरवरचे उपाय न करता शासनाने जनतेची प्रवृत्ती पालटण्‍यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे, अध्‍यात्‍म जगायला शिकवणे आवश्‍यक आहे. सखोल मुरलेली दुष्‍प्रवृत्ती नष्‍ट करण्‍यासाठी व्‍यक्‍तीमध्‍ये आमूलाग्र पालट घडवणारे अध्‍यात्‍मशास्‍त्र हेच योग्‍य शस्‍त्र आहे.

– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.