शनिशिंगणापूर येथे कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात शनिभक्तांकडून बेमुदत आमरण उपोषणाची घोषणा  !

उपोषणाला विश्‍व हिंदु परिषदेचा पाठिंबा !

शनिशिंगणापूर देवस्थान

अहिल्यानगर – शनिशिंगणापूर देवस्थानात विश्‍वस्त मंडळाच्या अनुमतीने चालू असलेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार आणि अनधिकृत कामगार भरती या अन् इतर मागण्यांसाठी ३० नोव्हेंबरपासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे. याची माहिती अहिल्यानगर येथील धर्मादाय आयुक्त कार्यालय, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक शिंगणापूर, नेवासा पोलीस ठाणे आणि तहसीलदार यांना निवेदनाद्वारे देण्यात आलेली आहे. हे निवेदन शिंगणापूरगावचे रहिवासी, तालुक्यातील नागरिक, शनि भक्तगण, तसेच सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे आणि अशोक टेमक यांनी दिले आहे. विश्‍व हिंदु परिषद, मठ मंदिर समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख मनोहर ओक यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की,

१. मागील काही मासामध्ये शनिशिंगणापूर देवस्थान येथे दर्शन पावतीमध्ये अनुमाने २ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. त्यामध्ये शनिशिंगणापूर चौथर्‍यावर जाण्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये पावती आहे. त्या पावत्या ‘शनिशिंगणापूर देवस्थान’च्या न देता खोट्या पावत्या छापून त्याची विक्री केली. शनिशिंगणापूर येथे देणगी घेण्यासाठी ‘बारकोड’ लावला होता आणि ‘बँक खाते तपशील’ शनिशिंगणापूर देवस्थानचा न देता, या लोकांनी स्वतः देवस्थानच्या नावे खाते उघडून त्यावर पैसे घेत होते. आजपर्यंत कोट्यवधी रुपयांची देणगी शनैश्‍वर या नावाने असलेल्या खासगी शिक्षण संस्थच्या नावे घेतली जाते. आजपर्यंत शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार येथे झाला आहे.

२. शनिशिंगणापूर देवस्थान येथे बोगस कामगार भरती केली आहे. त्यामध्ये १ सहस्र ३२३ आणि नवीन साधारण ६०० असे एकूण १ सहस्र ८०० पेक्षा अधिक मुले कर्मचार्‍यांना कायम केले आहे. ही कामगार भरती ‘शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट’ हे सरकार जमा करण्याचे आदेश झाल्यानंतर ठराव घेऊन त्यांना कायम करण्यात आले आहे; परंतु प्रत्यक्षात यांपैकी एकही व्यक्ती शनिशिंगणापूर देवस्थान येथे कामाला येत नाही. त्यांतील काही व्यक्ती हे मोठ-मोठ्या खासगी आस्थापनांमध्ये आधीच कायम असून ते तेथे प्रतिदिन कामावरही जात आहेत. तरीही त्यांना शनिशिंगणापूर देवस्थान येथे कायम करून देवस्थानकडूनही वेतन दिले जाते. शनिशिंगणापूर देवस्थान हे १ सहस्र ३२३ कर्मचारी काम करू शकतील इतके मोठे नाही. एवढे भाविक दर्शनालाही येत नाहीत.

३. देवस्थान येथे २४ घंटे वीज असूनही प्रतिमास ४० लाख रुपय मूल्याचे डिझेल जनरेटरच्या वापरासाठी विकत घेतले जाते.

४. शनिशिंगणापूर देवस्थान सुशोभीकरणासाठी २० कोटी रुपये किमतीची निविदा काढण्यात आली होती आणि ते पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत ५० कोटी १२ लाख रुपये व्यय झालेले आहेत, तरीही मंदिराचे काम केवळ ५० ते ६० टक्के पूर्ण झाले आहे.

५. आजपर्यंत शेकडो कोटी रुपये व्यय करून देवस्थानने ‘पानस नाला सूशोभीकरण प्रकल्प’ आणि दर्शन रांग सिद्ध केलेले आहे. हे सर्व काम हे पूर क्षेत्रात असून भूमीगत दर्शन रांग हीपण या क्षेत्रात आहे. या ठिकाणी पूर आल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते याला उत्तरदायी कोण ?

६. शनिशिंगणापूर येथील भाविक आणि नागरिक यांनी यापूर्वी नगरच्या धर्मादाय आयुक्तांकडे देवस्थानच्या भ्रष्टाचाराविषयी अन् नवीन कर्मचारी भरतीविषयी वेळोवेळी तक्रारी करूनही आजपर्यंत याची नोंद घेतली नाही.

७. कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया नियम प्रक्रिया डावलून झाली आहे. या कर्मचार्‍यांना देवस्थानकडून कोणतेही नियुक्ती पत्र दिलेले नाही. फक्त घरी बसून वेतन घेतात; मात्र या कर्मचार्‍यांचा वापर नेवासे तालुक्यातील राजकीय नेते, आमदार राजकारणासाठी करत आहेत. या कर्मचार्‍यांच्या नियुक्तीची आजपर्यंत कोणतीही चौकशी झालेली नाही.

८. त्या कर्मचार्‍यांना ‘बायोमेट्रीक हजेरी पद्धत’ आणि कोणतेही ‘दैनिक रजिस्टर’ ठेवलेले नाही. याविषयी चौकशी करण्याची मागणी करूनही मागणीप्रमाणे आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही.

निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्या !

१. देवस्थानमधील विश्‍वस्त मंडळाकडून गैरकारभार चालू असून हे मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा. कर्मचार्‍यांच्या भरती प्रक्रियेच्या चौकशीसाठी समिती गठीत करावी आणि दोषींवर फौजदारी गुन्हे नोंद करावेत.

२. श्री शनैश्‍वर देवस्थान विश्‍वस्त व्यवस्था अधिनियम २०१८ या कायद्याची लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी.

३. देवस्थानमधील सर्व कर्मचार्‍यांना बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी करण्यासह त्यांच्याकडील दैनंदिन कामकाजाचा लेखाजोखा ठेवावा.

४. तालुक्यातून तसेच इतर ठिकाणातून येणारे एकूण किती कर्मचारी देवस्थानकडे आहेत, त्यांची नेमणूक कधी झाली आणि त्यांना शासन कामगार वेतन या नियमाप्रमाणे वेतन देत असल्याविषयीचे भरती दिनांक सर्व कर्मचार्‍यांच्या नावासह दर्शनी भागात लावावेत. त्यामुळे गावातील ग्रामस्थांना आणि परिसरातील लोकांना देवस्थानकडे असलेल्या कर्मचार्‍यांविषयी माहिती राहील.

५. देवस्थानमध्ये एकूण १ सहस्र ८०० पेक्षा अधिक कामगारांच्या नियुक्तीची माहिती आहे. या कर्मचार्‍यांच्या नियुक्तीची चौकशी व्हावी. प्रशासनाकडे असलेल्या सर्व कर्मचार्‍यांची देवस्थानला आवश्यकता आहे का ? असल्यास विज्ञापन देऊन अर्ज मागणी केली का ? त्याविषयी खुलासा करावा.

६. दर्शनासाठी बनावट पावत्यांचा वापर होऊन देवस्थानची हानी केली जात आहे. बारकोडवरही शुल्क घेतले जाते. हे बारकोड कोणत्या अधिकोष खात्यांचे आहे, याची चौकशी व्हावी.

संपादकीय भूमिका

  • शनिभक्तांना असे आंदोलन करावे लागणे दुर्दैवी !
  • मंदिराचे सरकारीकरण झाल्याचा परिणाम !