मुंबई – येथील पर्यटनस्थळे जागतिक नकाशावर पोचवण्यासाठी, तसेच मुंबईची संस्कृती, कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रांतील अग्रगण्यता पर्यटकांपर्यंत पोचवण्यासाठी २० ते २८ जानेवारी या काळात ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती यांच्याकडून आयोजित पत्रकार परिषदेत पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
या वेळी मुंबई फेस्टिव्हलचे बोधचिन्ह ‘सपनो का गेटवे’ (स्वप्नाच्या प्रवेशद्वारात) याचे, तसेच संगीतकार श्री. टंडन यांनी रचलेल्या संकल्प गीताचे लोकार्पण करण्यात आले.
१. राज्य शासनाने ‘विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सी प्रा. लि.’ या आस्थापनाकडे मुंबई फेस्टिव्हलची संकल्पना आणि व्यवस्थापनेची धुरा सोपवली आहे.
२. ‘मुंबई फेस्टिवल’ सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा आहेत, मुंबई मॅरेथॉन आणि काळा घोडा कला महोत्सव हे मुंबई महोत्सवाचे सहयोगी कार्यक्रम म्हणून भाग आहेत.
३. ९ दिवसीय महोत्सवात कला, संस्कृती, क्रीडा, संगीत, नृत्य, चित्रपट, खाद्य संस्कृती आदी अनेक सांस्कृतिक महोत्सव, तसेच उपक्रम सादर केले जातील. हा उत्सव मुंबईच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशावर प्रकाश टाकणारे अनुभव आणि उपक्रम एकत्र आणणारा आहे. पर्यटनाला चालना देणे, विकास आणि सर्वसमावेशकता जोपासणे अन् उद्योगात नवीन संधी शोधण्यासाठी यातून साहाय्य होईल.