Goa Mining Issue : खाण क्षेत्रांच्या लिलाव प्रक्रियेला गती द्या ! – मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ऑक्टोबरपूर्वी खाण व्यवसाय चालू होणार असल्याचे आश्वासन रेंगाळले

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २३ नोव्हेंबर (वार्ता.) : खाण क्षेत्राच्या पुढील फेरीच्या लिलाव प्रक्रियेला गती देण्याचे सक्त निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खाण, वन आणि पर्यावरण विभागाच्या अधिकार्‍यांना दिले आहेत. चिरे, खडी, रेती आदी गौण खनिजांच्या संदर्भातही पर्यावरण दाखले, तसेच ‘लिज’ (‘लिज’ म्हणजे ठराविक कालावधीसाठी भूमी भाडेपट्टीवर देणे) नूतनीकरण प्रक्रियेला चालना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली २३ नोव्हेंबर या दिवशी खाणीसंबंधी एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत हे निर्देश देण्यात आले.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘पहिल्या २ टप्प्यांमध्ये ९ खाण क्षेत्रांचा (‘ब्लॉक’चा) लिलाव सरकारने केला आहे. राज्यातील एकूण ८६ खाण पट्ट्यांचे लिलाव करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. बैठकीत गौण खनिजाच्या संदर्भात पर्यावरण दाखले, ‘रॉयल्टी’ किंवा ‘ट्रान्झिट पास’ देणे, दंड ठोठावणे आदी विषयांवरही चर्चा करण्यात आली. प्रलंबित प्रश्न वेळेत सोडवण्याचे निर्देश अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.’’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीत खाण क्षेत्रांच्या लिलावासंबंधी प्रलंबित समस्यांचे निराकरण केले. पावसाळा संपूनही रेती व्यवसाय चालू झालेला नाही आणि यामुळे बांधकामे अडली आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीत या अनुषंगाने महत्त्वाचे निर्देश दिले. प्राप्त माहितीनुसार सर्व ८६ खाण क्षेत्रांचा ३ मासांच्या आत लिलाव केला जाणार असल्याचे सरकारने जानेवारी मासात घोषित केले होते; मात्र आतापर्यंत केवळ ९ खाण क्षेत्रांचा लिलाव झालेला आहे. ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने चालू आहे. त्याचप्रमाणे लिलाव झालेल्या खाणींसाठीही संबंधितांना पर्यावरण दाखले आणि अन्य परवाने घेणे आवश्यक बनले आहे. मुख्यमंत्र्यांनी चालू वर्षी ऑक्टोबरपूर्वी खाण व्यवसाय चालू होणार असल्याचे पावसाळ्याच्या पूर्वी घोषित केले होते; मात्र सध्याची गती पहाता खाण व्यवसाय लवकर चालू होणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत.