पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री सनातन धर्माविषयी जनजागृती करत आहेत ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री पुण्यातील दरबारात दर्शनासाठी उपस्थित !

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री व देवेंद्र फडणवीस

पुणे – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री सनातन धर्माची सेवा करत आहेत. सनातन धर्माची जनजागृती करत आहेत. भारतात जागृती झाली, तर जगात जागृती होईल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांनी २२ नोव्हेंबर या दिवशी पुण्यात येऊन बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे दर्शन घेतले. त्या वेळी ते बोलत होते.

फडणवीस पुढे म्हणाले की, रामलल्ला जिथे विराजमान होते, तिथेच प्रभु श्रीरामाचे मंदिर होत आहे आणि २२ जानेवारीच्या दिवशी तिथेच रामलल्लाची प्रतिष्ठापना होत आहे. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री जेव्हा सनातन धर्माची गोष्ट करतात, तेव्हा अनेक लोक त्यांना नावे ठेवतात. त्यांचा अपप्रचार करतात. ‘सनातन म्हणजे जातीयवाद, परंपरावाद’, असे काहीजण म्हणतात; पण त्यांना सनातनचा अर्थच कळलेला नाही. सनातनचा अर्थ म्हणजे जे अनादि आणि अनंत आहे, ते सनातन आहे. पुण्याचे भाग्य आहे की, पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री या ठिकाणी आले. त्यांनी रामकथाही सांगितली. जो रामकथा ऐकतो, त्याचे आयुष्य सार्थकी लागते.

देहू येथे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

 जे रामाचे भक्त असतात, ते सगळ्यांचे असतात ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

फडणवीस पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या पुढे नतमस्तक झाले. त्या वेळी पंडित धीरेंद्र शास्त्री यांनीही फडणवीस यांचे कौतुक केले. ‘देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत म्हणून मी त्यांचे कौतुक केलेले नाही. ते रामभक्त आहेत म्हणून मी त्यांच्याविषयी बोलत आहे. जे रामाचे भक्त असतात, ते सगळ्यांचे असतात. जे रामाचे भक्त नसतात, ते कुणाचेच नसतात’, अशा शब्दांत पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी फडणवीस यांचे कौतुक केले. शास्त्रींनी देहूत जाऊन संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शनही घेतले.