(‘अल्कोमीटर’द्वारे चाचणी म्हणजे मद्यप्राशन केले आहे का ? याची तपासणी करणे)
पणजी, १३ नोव्हेंबर (वार्ता.) : मद्यप्राशन करून बस चालवण्याचे प्रकार बंद होण्यासाठी कदंब महामंडळ राज्यातील महत्त्वाच्या बसस्थानकांवर ‘अल्कोमीटर’ ठेवणार आहे. एखाद्या प्रवाशाला किंवा महामंडळाच्या ‘कट्रोलर’ला एखादा चालकाने मद्यप्राशन केल्याचा संशय आल्यास त्याची चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती कदंब महामंडळाचे महाव्यवस्थापक संजय घाटे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
नुकत्याच पणजी-वाळपई मार्गावरील कदंब बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याच्या तक्रारी होत्या. या घटनेनंतर कदंब महामंडळाने संबंधित चालकाला सेवेतून निलंबित केले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कदंब महामंडळाने मद्यप्राशन करून बस चालवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत.