सनातन धर्माच्या रक्षणासाठी ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान राबवणार !
कोल्हापूर – उदयनिधी स्टॅलीन, प्रियांक खर्गे, निखिल वागळे, जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाराष्ट्रात ५५ हून अधिक ठिकाणी, तर कोल्हापूर जिल्ह्यात २ ठिकाणी तक्रार देऊनही अद्याप ‘हेट स्पीच’ करणार्यांवर कोणतीच कारवाई का करण्यात आली नाही ? त्यामुळे या पुढील काळात सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी ‘हेटस्पीच’ करणार्यांच्या विरोधात ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सर्वत्र राबवण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिली. ते २ नोव्हेंबरला कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई आणि ‘राष्ट्रहित प्रतिष्ठान’चे श्री. शरद माळी म्हणाले, ‘‘या देशात केवळ हिंदु धर्मीयच लक्ष केले जात आहेत. कोल्हापुरातील सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटना या अभियानासाठी हिंदु जनजागृती समिती समवेत आहेत.’ या प्रसंगी भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे उपस्थित होते.