विनोदासाठी धर्मविडंबन नको !

अलीकडे हसवण्‍यातून मनोरंजन करणारी आणि त्‍यातून अर्थाजन करून देणारी विनोदाचे व्‍हिडिओ (रिल्‍स) प्रसारित करण्‍यात येतात. विशेषतः हिंदूंचा कुठलाही सण किंवा उत्‍सव आला, की अशा विनोदविरांच्‍या कृत्‍यांना उधाण येते. अधिक मास, गणेशोत्‍सव, श्राद्ध, नवरात्र आदी सर्व धार्मिक कृतींवर काही तरी विनोद करून त्‍याचे व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांतून हिंदूंकडूनच प्रसारित केले जातात.

यामध्‍ये ‘अधिक मासात जावयाला वाण देण्‍यावरून विनोद करणे’, ‘श्राद्धासाठी कावळा मिळत नाही; म्‍हणून नवर्‍याला ‘कावळा’ म्‍हणून पाठवणे’, ‘पत्नीला चिडलेली दुर्गादेवी दाखवणे’ इत्‍यादी विषयांचा समावेश असतो. जगातील एकातरी धर्मात अशा प्रकारे स्‍वतःच्‍या धर्माविषयी विनोद करणारे आढळतात का ? पण दुर्दैवाने हिंदु धर्मात ते आढळतात. त्‍यामुळे त्‍यांना जन्‍महिंदूच, म्‍हणजे केवळ ‘जन्‍माने हिंदु असलेले’ (पण प्रत्‍यक्षात हिंदु धर्माप्रमाणे कृती न करणारे) म्‍हटले गेले पाहिजे.

हिंदु धर्मियांची युवा पिढी अशा प्रकारे ‘धर्म समजून न घेता’ स्‍वधर्माचे विडंबन करण्‍यात मग्‍न आहे. हिंदूंना धर्मशिक्षण दिले न गेल्‍याने ते त्‍यांच्‍या पाल्‍यांवर धर्मसंस्‍कार करू शकलेले नाहीत आणि त्‍याचाच हा दुष्‍परिणाम आहे. तुलनेत अन्‍य पंथियांची युवा पिढी धर्माचरणाच्‍या संस्‍कारामुळे त्‍यांच्‍या धर्माविषयी कट्टर आहे.

दुसरीकडे समाजात हिंदु धर्माविषयी काही प्रमाणात जागृतीही होत आहे. हिंदूंचा गौरवशाली इतिहास आणि धर्मसंस्‍कृती ही वैज्ञानिक कशी आहे ?, याविषयी हिंदूंच्‍या नव्‍या पिढीमध्‍ये उत्‍सुकता आणि जिज्ञासा निर्माण होऊन जागृतीही होत आहे. जे हिंदु तरुण अशा प्रकारे स्‍वधर्मावर अज्ञानातून विनोद करतात, त्‍यांनी धार्मिक कृतीमागील शास्‍त्र समजून घेणे आवश्‍यक आहे. धर्मशिक्षणाविषयी जागरूक झालेल्‍या हिंदूंच्‍या नव्‍या पिढीने धर्मसंस्‍कृतीवर विनोद करणार्‍या हिंदूंच्‍या सूत्राचे योग्‍य खंडण करणारे व्‍हिडिओ प्रसारित  केले पाहिजेत.

धर्म व्‍यापक आहे. त्‍याचा महिमा समजून घेतला, तर आपणही व्‍यापक आणि आनंदी बनू. धार्मिक कृतींच्‍या विडंबनाकडे साक्षीभावाने पहाणार्‍यालाही पाप लागते.

त्‍यामुळे धार्मिक विडंबनाकडे केवळ विनोद म्‍हणून न पहाता, त्‍याविरोधात संबंधितांचे सनदशीर मार्गाने प्रबोधन करायला हवे. असे केले तरच ‘धर्मो रक्षति रक्षितः’ या न्‍यायाने धर्म आपले रक्षण करेल !

– सौ. अनुभूती नीलेश टवलारे, अमरावती.