Health Ministry On HMPV Outbreak : चीनमधील ‘एच्.एम्.पी.व्ही.’ विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना राज्य सरकारडून महत्त्वाच्या सूचना !

राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना घोषित  

पुणे – चीनमध्ये ‘एच्.एम्.पी.व्ही.’ म्हणजेच मानवी मेटान्यूमो हा विषाणू वेगाने पसरत आहे. याविषयी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने राज्यातील यंत्रणेसह नागरिकांसाठी एक परिपत्रक काढले असून यात महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याच्या आरोग्य मंडळाने जिल्हा रुग्णालयांना पत्र लिहिले असून यामध्ये ‘एच्.एम्.पी.व्ही.’ची माहिती आणि आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

रुग्णालयांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, चीनमधून आलेल्या नवीन विषाणूच्या अहवालांच्या संदर्भात चिंतेचे कारण नाही. याविषयी आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता नाही. तथापी या पार्श्‍वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतीमान करून सर्दी-खोकला असणार्‍या रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात यावेत.

आरोग्य विभागाने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,

हा विषाणू म्हणजे तीव्र श्‍वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडमध्ये वर्ष २००१ मध्ये आढळला. हा एक सामान्य श्‍वसन विषाणू आहे. त्याच्यामुळे श्‍वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्ग (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरतो. हा एक हंगामी रोग असून तो सामान्यतः आर्.एस्.व्ही. आणि फ्लू यांच्याप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूंच्या आरंभी उद्भवतो.

सूचनांचे पालन करण्याचे आवाहन !

सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्‍वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्‍लेषण केले आहे. वर्ष २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. दक्षतेचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्‍वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

हे करा !

१. आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल, तेव्हा आपले तोंड आणि नाक रूमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.

२. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने हात वारंवार धुवा.

३. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.

४. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा !

५. संक्रमण अल्प करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायूविजन (व्हेंटिलेशन) होईल, याची दक्षता घ्या.

काय करू नये ?

हस्तांदोलन करू नये. टिश्यू पेपर आणि रूमाल यांचा पुनर्वापर टाळावा, तसेच आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळावा.