Kanpur Mayor Pramila Pandey : उत्तरप्रदेशातील कानपूरच्या महिला महापौरांनी मुसलमानबहुल भागातील बंद असलेली ३ मंदिरे उघडली !

कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे

कानपूर (उत्तरप्रदेश) – काही दिवसांपूर्वी कानपूरच्या महापौर प्रमिला पांडे यांनी शहरातील मुसलमानबहुल भागात गेल्या अनेक वर्षांपासून बंद असणारी हिंदूंच्या मंदिरे शोधली होती. त्यांना अशी ५ मंदिरे सापडली, तर संपूर्ण शहरात १०० हून अधिक मंदिरे आहेत, अशी आकडेवारी प्रशासनने दिली होती. ६ जानेवारी या दिवशी महापौर पांडे यांनी मुसलमानबहुल भागातील हिरामणपुरवा परिसरात जाऊन ३ शिवमंदिरे उघडली. या वेळी त्यांच्या समवेत पोलीसही होते. ही तिन्ही मंदिरे अनेक वर्षांपासून बंद होती. ती जीर्णावस्थेत आहेत. मंदिरातील मूर्ती खंडित स्थितीत आढळल्या, तर शिवलिंग गायब होते. ही मंदिरे आता स्वच्छ करून सुरक्षित करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच अतिक्रमण करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महापौरांच्या मोहिमेला मुसलमान धर्मगुरूंचा विरोध

यापूर्वी महापौरांकडून मुसलमानबहुल भागांत मंदिरे शोधण्याच्या मोहिमेवर बंदी घालण्याची मागणी मुसलमान धर्मगुरूंनी पोलीस आयुक्तांकडे केली होती. यावर महापौर प्रमिला पांडे म्हणाल्या की, मी जे काही करत आहे ते सर्व कायद्याच्या चौकटीत राहून करत आहे.

संपादकीय भूमिका

कानपूरच्या महिला महापौर प्रमिला पांडे यांच्याकडून सर्वत्रच्या शासनकर्त्यांनी आदर्श घेतला पाहिजे आणि मुसलमानबहुल भागांतील बंद असणार्‍या मंदिरांना उघडून सुरक्षित केले पाहिजे !