स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सर्वांनाच प्रेरणादायी ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

वर्धा, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – वर्धा या ऐतिहासिक शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती स्मारक हे वर्तमानातील आणि भविष्यातील तरुणांना अवगत करणारे उत्तम स्मारक असून या स्मारकात लिहिलेला स्वातंत्र्याचा घटनाक्रम आणि भित्तीचित्रे ही सर्वांना प्रेरणादायी ठरावीत अशीच आहेत, असा अभिप्राय सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी व्यक्त केला. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने वर्धा येथे नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते वर्धा येथे आले होते. तेव्हा त्यांनी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे आवर्जून दर्शन घेतले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्रीकांत पिसोळकर, समितीचे यवतमाळ जिल्हा समन्वयक श्री. प्रफुल्ल टोंगे, समितीचे अमरावती जिल्हा समन्वयक नीलेश टवलारे, वर्धा येथील नरेंद्र देशपांडे आदी उपस्थित होते.