भारतीय सैन्याधिकार्‍यांच्या भ्रमणभाषमध्ये ‘व्हायरस’ पाठवून संवेदनशील माहिती चोरणार्‍या पाकच्या हेराला अटक !

गुजरात आतंकवादविरोधी पथकाने केली कारवाई !

अटक करण्यात आलेला पाकिस्तानी हेर

कर्णावती (गुजरात) – गुजरात आतंकवादविरोधी पथकाने २० ऑक्टोबर या दिवशी एका पाकिस्तानी हेराला अटक केली. तो वर्ष १९९९ पासून भारतात रहात आहे. त्याने भारतीय नागरिकत्वही मिळवले आहे. त्याच्या परिचयाच्या भारतियांचा शोधही आता घेतला जात आहे. यासाठी पथक विविध ठिकाणी धाडी घालत आहे.

लाभशंकर दुर्योधन माहेश्‍वरी असे अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी हेराचे नाव असून तो भारतीय सैन्याची संवेदनशील माहिती पाकला पुरवत होता. तो गुजरात येथील आणंद जिल्ह्यात असलेल्या तारापूर येथे रहात होता. त्याच्याकडून पैसे आणि सिमकार्ड हस्तगत करण्यात आले आहे.

तो स्वत:ला ‘आर्मी पब्लिक स्कूल’चा अधिकारी असल्याचे सांगून सैन्याधिकारी, तसेच त्यांचे कुटुंबीय यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क करत असे. संपर्क प्रस्थापित केल्यानंतर माहेश्‍वरी त्यांच्या भ्रमणभाषाला ‘रिमोट एक्सेस ट्रोजन मालवेयर’ नावाच्या संगणकीय प्रणालीद्वारे (‘व्हायरस’द्वारे) स्वत:च्या नियंत्रणात घेत असे. या माध्यमातून तो भारतीय सैन्याची संवेदनशील माहिती हस्तगत करून ती पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय.ला पुरवत असे.