दोन्ही गटांकडून परस्परांविरोधात तक्रारी; ३६ जणांवर गुन्हा नोंद !
पुणे – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील पुजार्यांच्या २ गटांमध्ये मारामारी झाली. देवाच्या मूर्तीवर अभिषेक आणि पूजा करणार्या पुजार्यांनी पूजा करण्यासाठी संधी मिळण्यावरून एकमेकांवर लाकडी काठ्या आणि लोखंडी सळ्या यांनी मारहाण केली. १६ ऑक्टोबर या दिवशी ही घटना घडली. यानंतर दोन्ही गटांतील ३६ पुजार्यांवर खेड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. शंकर कौदरे यांनी प्रविष्ट केलेल्या तक्रारीवरून २१ जणांविरोधात, तर गोरक्ष कौदरे यांच्या तक्रारीवरून १५ जणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अधिवक्ता सुरेश कौदरे या संदर्भात म्हणाले की, चालू असलेल्या पूजेच्या कामात अडथळा आणणे, हे जाणीवपूर्वक खोडसाळपणा करण्यासारखे आहे. सगळे लोक आमचेच आहेत. सामोपचाराने त्यावर तोडगा काढू; मात्र दंडेलशाही खपवून घेतली जाणार नाही.