सातारा, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – राज्यातील अपंगांशी चर्चा करून त्यांच्यासाठी चांगले धोरण सिद्ध करून अपंगांच्या अडचणी सोडवण्यात येतील. सातारा जिल्हा अपंगांच्या योजना राबवण्यात आदर्श जिल्हा निर्माण व्हावा, अशी अपेक्षा दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक अपंगांपर्यंत प्रशासनाने पोचून विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक बळ द्यावे. अपंगांच्या बचत गटांना, तसेच उद्योग-व्यवसाय वाढीसाठी प्रत्येक तहसील, प्रांत आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये जागा देण्याचे धोरण लवकरच आणणार आहेत. ग्रामीण भागातील अपंगांच्या घरांसाठी २ लाख ५० सहस्र रुपये अनुदान मिळावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. जिल्हा प्रशासनाने मोठ्या मॉल उद्योगांमध्ये अपंगांना रोजगार उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करावेत.