तणावाला तोंड देणे, नेतृत्वविकास, निर्णयक्षमता आदी शिकवले जाणार !
नवी देहली : देशभरातील सर्व महाविद्यालयांत आता ‘जीवन कौशल्य अभ्यासक्रम’ (लाईफ स्किल्स कोर्स) चालू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम कोणतीही पदवी घेणार्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. ‘सामान्य पदवीधर बेरोजगारीचा सामना करतात’, असे वारंवार दिसून येते. अशा पदवीधरांकडे अभियांत्रिकी अथवा वैद्यकीय पदवीधर यांच्याप्रमाणे नोकरी मिळवण्याचे आवश्यक कौशल्य नसते. आता वरील अभ्यासक्रम शिकवल्याने अशा विद्यार्थ्यांना ते शिकत असतांनाच नोकरी मिळण्यायोग्य बनवले जाईल. यासमवेतच विद्यार्थ्यांचा सामाजिक आणि वैयक्तिक विकास, तसेच संवादकौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, योग्य दिशेने विचार करण्याचे कौशल्य, निर्णयक्षमता, आर्थिक व्यवस्थापन, तणावाला तोंड कसे द्यावे ? आदी सूत्रांविषयी शिकवले जाईल.
‘कम्युनिकेशन स्किल्स’, ‘प्रोफेशनल स्किल्स’, ‘लीडरशिप-मॅनेजमेंट स्किल्स’, ‘युनिव्हर्सल ह्यूमन व्हॅल्यूज’ आदी विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश असेल. यात कृत्रिम बुद्धीमत्ता यासारखे अत्याधुनिक विषयांचाही समावेश असेल. नोकरीच्या मुलाखतीची सिद्धताही या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.
संपादकीय भूमिकाकेंद्रशासनाने युवा पिढीची स्थिती पाहून अशा प्रकारचा अभ्यासक्रम आणला, हे स्तुत्य पाऊल आहे. यासह युवा पिढीला साधना शिकवून तिच्याकडून ती करून घेतली, तर तिच्या जीवनातील अनेक समस्या ती स्वत: सोडवण्यास सक्षम बनेल ! |