श्री तुळजाभवानीदेवीचे २०७ किलो सोने वितळवण्यास विधी विभागाची अनुमती !

श्री तुळजाभवानीदेवी

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येथील श्री तुळजाभवानीदेवीच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेले सोने वितळवण्यास विधी आणि न्याय विभागाने संमती दिली आहे. भक्तांनी वर्ष २००९ पासून २०७ किलो सोने आणि २ सहस्र ५७० किलो चांदी अर्पण केली आहे. त्यांतील २०७ किलो सोने वितळवण्यात येणार आहे. ‘२०७ किलो सोने वितळल्यास त्यातून १११ किलो शुद्ध सोने मिळू शकते’, असा अंदाज आहे. यापूर्वी देवीला अर्पण आलेले ४७ किलो शुद्ध सोने आहे. त्यामुळे एकूण १५० किलो शुद्ध सोने देवीच्या चरणी जमा होऊ शकते.

१. देवीच्या डब्यातील पुरातन दागिने मोजण्याच्या प्रकरणी चौकशी समितीने दिलेल्या अहवालावर मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी बैठक घेतली.

२. या अहवालावर चर्चा करून समितीने काढलेल्या निष्कर्षानंतर कोणती कायदेशीर कारवाई करावी, याविषयी विधी विभागाचे मार्गदर्शन मागवले आहे. येत्या सप्ताहभरात अंतिम अहवालावर कायदेशीर मार्गदर्शन येण्याची शक्यता आहे.

३. देवीच्या खजिन्यातील काही सोन्याचे दागिने गहाळ आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य राजघराणी यांनी देवीला अर्पण केलेल्या नाण्यांच्या चोरी प्रकरणी यापूर्वी तत्कालीन धार्मिक व्यवस्थापकांवर गुन्हा नोंद झाला असून त्यातील एकही नाणे पोलिसांना अद्याप सापडलेले नाही.

४. ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणांमध्ये कोणती कारवाई करावी, याविषयी कायदेशीर सल्ला घेतला जात आहे.

संपादकीय भूमिका

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यास तेथे कशा प्रकारे व्यवहार चालतात, याचे हे उदाहरण होय ! त्यामुळे मंदिरे भक्तांच्या कह्यात देणे आवश्यक !