कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासाठी विश्व हिंदु परिषद-बजरंग दलाच्या वतीने आयोजित राष्ट्रव्यापी शौर्य जागरण यात्रा देशाचे सशक्तीकरण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ही यात्रा ७ ते १० ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात होत असून कोल्हापुरातील सकल हिंदु समाज आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना या यात्रेत सहभागी होणार आहोत. जनतेनेही या यात्रेत सहभागी होऊन या राष्ट्र कार्यामध्ये त्यांचे योगदान द्यावे, असे आवाहन हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्यांनी केले. हे आवाहन ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने आयोजित ५ ऑक्टोबरला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले.
या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप आणि श्री. नंदकुमार घोरपडे, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे श्री. सुनील सामंत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, मूर्तीअभ्यासक आणि विश्लेषक श्री. उमाकांत राणिंगा, श्री. प्रमोद सावंत, विश्व हिंदु परिषद-बजरंग दल प्रसिद्धीप्रमुख श्री. राजेंद्र मकोटे उपस्थित होते.
श्री. दीपक देसाई म्हणाले, ‘‘या यात्रेत मंगळवार, १० ऑक्टोबरला भव्य दुचाकी फेरी होणार आहे. तरी सर्व तरुणांनी त्यांच्या दुचाकी वाहनावरून दुपारी ४ वाजता ताराबाई पार्क येथे जमावे.’’