देहली पोलिसांकडून पत्रकारांच्या निवासस्थानांसह ३५ ठिकाणी धाडी !

  • ‘न्यूज क्लिक’ वृत्तसंकेतस्थळाशी संबंधित पत्रकारांचा समावेश !

  • काही पत्रकारांना घेतले कह्यात

नवी देहली – देहली पोलिसांनी ३ ऑक्टोबर या दिवशी देहली, तसेच उत्तरप्रदेशातील नोएडा आणि गाझियाबाद येथील एकूण ३५ ठिकाणी धाडी घातल्या. यांपैकी ७ धाडी पत्रकारांच्या घरांवर धाडी घालण्यात आल्या आहेत. हे पत्रकार ‘न्यूज क्लिक’ या वृत्तसंकेतस्थळाशी संबंधित आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पत्रकार अभिसार शर्मा, उर्मिलेश, एन्.डी.टी.व्ही.चे माजी कार्यकारी संपादक औनिंदो चक्रवर्ती यांना कह्यात घेतले आहे.

(सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

१. धाडीतून पोलिसांनी लॅपटॉप, भ्रमणभाषसह इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले असून हार्ड डिस्कचा डेटाही कह्यात घेतला आहे. संकेतस्थळाचे संस्थापक/संपादक यांच्याशी संलग्न निवासस्थाने आणि इमारती यांवरही धाडी टाकण्यात आल्या.

२. कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या घरावरही धाड टाकण्यात आली. विनोदी अभिनेते संजय राजौरा यांना चौकशीसाठी नेण्यात आले आहे.

३. धाडीनंतर ७ पैकी पत्रकार उर्मिलेश आणि गौरव यादव देहली पोलिसांच्या विशेष पथकाच्या कार्यालयात पोचले. पत्रकार अभिसार शर्मा यांचा भ्रमणभाष आणि लॅपटॉप पोलिसांनी कह्यात घेतला आहे.

४. या वृत्तसंकेतस्थळाच्या विरोधात पोलिसांनी कलम १५३ अ (दोन गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आणि भारत दंड विधान १२० ब (गुन्हेगारी कट) या अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. ५. या वृत्तसंकेतस्थळाला चीनकडून निधी मिळाल्याच्या आरोपांमुळे तिची देहली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा आणि अंमलबजावणी संचालनालय यांच्याकडून चौकशी चालू आहे. चीनकडून मिळालेला निधी अनधिकृतरित्या प्राप्त झाला असल्याचे सांगितले जात आहे.

५. अंमलबजावणी संचालनालयाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या धाडी घातल्या. अंमलबजावणी संचालनालयाच्या अन्वेषणात  तपासात ३ वर्षांच्या कालावधीत ३८ कोटी ५ लाख  रुपयांच्या विदेशी निधीची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

संपादकीय भूमिका 

जर या पत्रकारांनी चीनकडून पैसे घेऊन भारतविरोधी काम केले असेल, तर अशांना फाशीचीच शिक्षा केली पाहिजे !