कॅनडा आरोपांविषयी माहिती देत असेल, तर भारत चर्चेला सिद्ध ! – डॉ. जयशंकर

वॉशिंगटन (अमेरिका) – आम्ही आतंकवादी निज्जर याच्या हत्येच्या संदर्भात भारताच्या हस्तकांच्या सहभागाच्या आरोपांविषयी कॅनडाशी चर्चा करण्यास सिद्ध आहोत.

आम्ही कॅनडाला सांगितले आहे की, अशा प्रकारे कुणाची हत्या करण्याची आमच्या सरकारची नीती नाही; मात्र जर कॅनडा आमच्या समवेत काही माहितीची देवाण घेवाण करण्यास सिद्ध असेल, तर आम्ही त्यावर विचार करण्यास सिद्ध आहोत. सध्या तरी हेच प्रकरण आहे, अशी माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे भारतीय पत्रकारांशी बोलतांनी दिली.

डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की, आम्ही अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन आणि  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्या समवेत भारत अन् कॅनडा यांच्यातील वादावर चर्चा केली. महत्त्वाची गोष्टी ही आहे की, आमच्या दूतावासातील अधिकारी आणि कर्मचारी यांना कॅनडामध्ये सातत्याने धमकावले जात आहे. यामुळे त्यांचे तेथे काम करणे सुरक्षित राहिलेले नाही.