पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांच्‍या प्रथम वर्ष श्राद्धविधीच्‍या वेळी त्‍यांचे पती श्री. प्रकाश मराठे (वय ७८ वर्षे, आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांना जाणवलेली सूत्रे

पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांचा प्रथम वर्ष श्राद्धविधी ४.७.२०२३ आणि ५.७.२०२३ या दोन दिवशी रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात करण्‍यात आला. त्‍यांचे पती श्री. प्रकाश मराठे (वय ७८ वर्षे, आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांना त्‍या विधींच्‍या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे

१. श्राद्धविधीचा प्रथम दिवस

‘४.७.२०२३ या दिवशी पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांचा प्रथम वर्ष श्राद्धविधी (पहिल्‍या दिवसाचा) रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात सकाळी ११.३० ते २.३० या कालावधीत करण्‍यात आला. विधीचे पौरोहित्‍य सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर आणि श्री. ईशान जोशी यांनी केले. विधीचे सर्व साहित्‍य शास्‍त्रानुसार होते. त्‍यांतील केळीची पाने पाहून माझा भाव जागृत होत होता. हे श्राद्ध चटावरचे (टीप) , म्‍हणजे प्रत्‍यक्ष ब्राह्मणांना न बसवता दर्भावर करतात.

(चटावरचे श्राद्ध : ‘जेव्‍हा श्राद्धात प्रत्‍यक्ष ब्राह्मण बसवणे शक्‍य नसते, त्‍या वेळी आसनावर दर्भाच्‍या विशिष्‍ट गाठी मारून ते ‘देव ब्राह्मण’ आणि ‘पितृ ब्राह्मण’ असल्‍याचे समजून श्राद्ध करतात. या विशिष्‍ट गाठी मारलेल्‍या दर्भांना ‘चट’ असे म्‍हणतात.’)

१ अ. श्राद्धाला आरंभ झाल्‍यापासून श्राद्ध संपेपर्यंत वातावरण चैतन्‍यमय आणि स्‍थिर असणे : श्राद्धाला आरंभ झाल्‍यापासून श्राद्ध संपेपर्यंत वातावरण एकदम शांत, स्‍थिर आणि चैतन्‍यमय जाणवत होते. श्राद्धविधी होत असलेल्‍या ध्‍वनीचित्रीकरण कक्षात एकदम प्रसन्‍न वाटत होते. विधी चालू असतांना माझे मन शांत आणि स्‍थिर होते. हा विधी ‘भूवैकुंठातच होत आहे’, असे मला वाटत होते.

१ आ. सूक्ष्म ज्ञानप्राप्‍तकर्त्‍या साधकांना जाणवलेली सूत्रे

१ आ १. श्री. निषाद देशमुख यांना श्राद्धाच्‍या ठिकाणी ऋषी आणि देवता यांचे अस्‍तित्‍व जाणवणे : सूक्ष्म ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के) आणि कु. मधुरा भोसले (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के ) हे या विधींचे सूक्ष्म परीक्षण करत होते. श्री. निषाद यांनी सांगितले, ‘‘जेव्‍हा गुरुजींनी ऋषी आणि देवता यांना आवाहन केले. तेव्‍हा प्रत्‍यक्ष ऋषी तर तेथे आलेच; परंतु भगवान श्रीविष्‍णुही तेथे आले होते. या वेळी श्रीविष्‍णु आल्‍याची ही मोठी अनुभूती होती. या दिवशी मला व्‍यष्‍टी भाव जाणवला.’’

१ आ २. कु. मधुरा भोसले यांना ‘हा श्राद्ध विधी नसून ही सत्‍यनारायण पूजाच आहे’, असे जाणवले.

२. श्राद्धविधीचा द्वितीय दिवस

श्री. प्रकाश मराठे

५.७.२०२३ या दिवशी दुसर्‍या दिवसाचा विधी रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमाच्‍या सभागृहात सकाळी १०.३० ते दुपारी २.०० या कालावधीत करण्‍यात आला. या दिवशीही विधीचे पौरोहित्‍य सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहित श्री. अमर जोशी, श्री. सिद्धेश करंदीकर आणि श्री. ईशान जोशी यांनी केले. साधारण १२ वाजता सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहित श्री. दामोदर वझेगुरूजीही (आध्‍यात्मिक पातळी ६० टक्‍के) आले.

२ अ. श्राद्धविधी हा गुरुपौर्णिमेचा सोहळा असल्‍याचे जाणवणे : या दिवशीही वातावरणात शांतता, स्‍थिरता आणि चैतन्‍य जाणवत होते. विधी योग्‍य पद्धतीने होत होते. मला लहान पटलावर बसून विधी करणे थोडेसे कठीण वाटत होते; पण दोन्‍ही दिवशी मी गुरुकृपेने ते करू शकलो; म्‍हणून मी गुरूंप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त केली. विधीसाठी आलेल्‍या पाहुण्‍यांना आश्रम दाखवण्‍यात आला. ५.७.२०२३ या दिवशी ‘दैनिक सनातन प्रभात’मध्‍ये कै. पू. (सौ.) शालिनी मराठे यांच्‍याविषयीचा लेख प्रसिद्ध करण्‍यात आला होता. मी प्रत्‍येकाला तो अंक दिला, तर काही पाहुण्‍यांना  सनातनचे ग्रंथ दिले. त्‍या सर्व पाहुण्‍यांनी सनातन आश्रम त्‍यांना पुष्‍कळ आवडल्‍याचे सांगितले. पिंडांना नमस्‍कार करतांना जवळजवळ ४० ते ५० जण उपस्‍थित होते. त्‍या वेळी तेथील चैतन्‍य पाहून ‘तो गुरुपौर्णिमेचा सोहळाच आहे’, असे मला वाटत होते.

२ आ. सूक्ष्म ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांना ‘सर्वत्र श्री दत्ततत्त्व पसरले आहे’, असे जाणवून विधीच्‍या ठिकाणी कै. पू. (सौ.) शालिनी मराठे यांचे अस्‍तित्‍व जाणवले.

२ इ. विधीच्‍या ठिकाणी मलाही कै. पू. (श्रीमती) सीताबाई मराठे (श्री. प्रकाश मराठे यांच्‍या आई) आणि कै. पू. (सौ.) शालिनी मराठे (श्री. प्रकाश मराठे यांच्‍या पत्नी) यांचे अस्‍तित्‍व जाणवले.

२ इ. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले वास्‍तव्‍य करत असलेल्‍या भूवैकुंठात हा विधी झाला असल्‍याने याचे फळ गया,  प्रयाग, काशी इथे झालेल्‍या श्राद्धविधींपेक्षा अनेक पटींनी मिळत असल्‍याचे पुरोहित साधक श्री. दामोदर वझे यांनी सांगणे : हा विधी समष्‍टी स्‍तरावर झाला. सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहित श्री. दामोदर वझेगुरूजींनी प्रार्थना केली. त्‍यांनी सांगितले, ‘‘या ठिकाणी प्रत्‍यक्ष सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हेे वास्‍तव्‍य करत असल्‍याने हा विधी भूवैकुंठात झाला. हा विधी गया, प्रयाग, काशी येथे केल्‍यावर जे फळ प्राप्‍त होते, त्‍या स्‍थानांपेक्षाही इथे याचे फळ अनेक पटींनी मिळते. या विधीत दोन संतांचा, म्‍हणजे कै. पू. (श्रीमती) सीताबाई मराठे आणि कै. पू. (सौ.) शालिनी मराठे यांचा संग लाभला ही मोठी भाग्‍याची गोेष्‍ट आहे.’’

प.पू. डॉक्‍टरांच्‍या कृपेने हे सगळे घडून आले. त्‍यांनी ते घडवून आणले. त्‍यासाठी मी त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. प्रकाश रा. मराठे (वय ७८ वर्षे, आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.७.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.