वादळी वार्‍यासह पावसाने गोव्याला झोडपले : जनजीवन विस्कळीत !


मुसळधार पावसामुळे गोव्यातील काही भागात पूरसदृश परिस्थिती !

पणजी, २९ सप्टेंबर (वार्ता.) : २८ सप्टेंबरच्या रात्रीपासून सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसाने राज्याला झोडपले आहे. यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागात पाणी साचल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली आहे. राजधानी पणजी शहरात ५ घंट्यांमध्ये २ इंचाहून अधिक पावसाची नोंद झाल्याने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडल्याने संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

दक्षिण कोकण आणि गोव्याची किनारपट्टी या भागांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने १ ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीची चेतावणी हवामान विभागाने दिली आहे.

पेडणे तालुक्यात जोरदार वार्‍यामुळे झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले आहेत. मोपा येथील श्री दाडेश्‍वर मंदिराजवळील रस्त्यावर माड कोसळला. यामध्ये विजेच्या खांबाचीही हानी झाली, तसेच रस्त्यावरील वाहतुकीचीही कोंडी झाली. २९ सप्टेंबर या दिवशी सकाळी ८.३० वाजेपर्यंत मागील २४ घंट्यांमध्ये म्हापसा येथे २.५९ इंच, पेडणे १.२१ इंच, फोंडा २.९१ इंच, पणजी २.९७ इंच, जुने गोवे ३ इंच, सांखळी १.१४ इंच, दाबोळी ४.५९ इंच, मडगाव ४.१९ इंच, मुरगाव ३.८८ इंच, केपे ०.७१ इंच आणि सांगे येथे १ इंच पावसाची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत १२८.९ इंच पावसाची नोंद झाली आहे.