‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्‍या साधनेत ‘अंतर्मुखता’ या गुणाचे महत्त्व आणि ‘ती कशी साधावी ?’ याविषयी सनातनचे संत पू. उमेश शेणै यांनी केलेले विवेचन

देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात वास्‍तव्‍यास असणारे सनातनचे १७ वे संत पू. उमेश शेणै यांनी ‘अंतर्मुखता म्‍हणजे काय ?, ती नसल्‍यास होणारी हानी आणि ‘साधनेत अंतर्मुखतेचे महत्त्व किती अधिक आहे’, याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. साधनेत अंतर्मुखता अत्‍यंत महत्त्वाची असून ती साधण्‍यासाठी मनाचे निरीक्षण करणे आवश्‍यक !

‘साधनेत स्‍वतःमध्‍ये सुधारणा करून स्‍वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करतांना अंतर्मुख होण्‍याचा वाटा पुष्‍कळ मोठा आहे. ‘द्रष्‍ट्याने दृष्‍यात अडकून बहिर्मुख वृत्तीने वागणे’, हे सर्वसामान्‍यांचे लक्षण आहे. ‘मन’ नावाचा सतत धावणारा एक घोडा आहे. त्‍याला लगाम घातला नाही, तर साधनेत अधोगती होण्‍यास वेळ लागत नाही. स्‍वतःच स्‍वतःला सुधारून पुढच्‍या टप्‍प्‍याला जाण्‍यासाठी अंतर्मुखता महत्त्वाची आहे.

प्रत्‍येक प्रसंगात ‘मनात काय काय घडते ?’, याचा अभ्‍यास करणे, ‘मन शुद्ध करून ते नियंत्रणात ठेवण्‍यात ‘मी कुठे न्‍यून पडलो ?’, ते पहाणे आणि स्‍वतःकडून झालेल्‍या चुका, अयोग्‍य विचार अन् कृती ओळखून त्‍यात पालट करणे’, ही सर्व अंतर्मुखतेची लक्षणे आहेत. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांनी ‘मनाच्‍या विरुद्ध जाणे, म्‍हणजे साधना’, असे सांगितले आहे.

२. ‘अंतर्मुखता’ आणि ‘समष्‍टी साधनेचा समन्‍वय’ कसा साधावा ?

पू. उमेश शेणै

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांनी साधकांना स्‍वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्‍यासाठी सेवा अन् अन्‍य साधकांच्‍या माध्‍यमातून मोठी समष्‍टी दिली आहे. त्‍यांनी ‘व्‍यक्‍ती तितक्‍या प्रकृती तितके साधनामार्ग’ हा सिद्धांतही सांगितला आहे. पृथ्‍वीवरील सध्‍याची लोकसंख्‍या जवळजवळ ८०० कोटी आहे, म्‍हणजे पृथ्‍वीवर ८०० कोटी प्रकृती आणि ८०० कोटी मने आहेत. एवढ्या सर्वांचे मन एकाच प्रकारचे असणे शक्‍यच नाही; कारण प्रत्‍येकाच्‍या चित्तातील संस्‍कार वेगवेगळे असतात. इथे ‘अंतर्मुखता’ आणि ‘समष्‍टी साधनेचा समन्‍वय असणे’ अत्‍यंत महत्त्वाचे असते. ‘तो कसा हवा ?’, हे जाणून घेऊया.

२ अ. पहिला टप्‍पा – प्रत्‍येक प्रकृतीशी जुळवून घेणे : अंतर्मुखता म्‍हणजे स्‍वतःला जाणून घेऊन स्‍वतःत पालट करणे. साधकाला प्रत्‍येक प्रकृतीशी जुळवून घेऊन वागता यायला पाहिजे. त्‍यासाठी इतरांच्‍या मनातील स्‍पंदने आपल्‍या मनाच्‍या स्‍पंदनांशी जोडायची, जुळवायची आणि त्‍यात परिवर्तन करायचे, असे करावे लागते. ‘सोबत असणारा प्रत्‍येक साधक म्‍हणजे गुरुदेवांनी स्‍वतःच्‍या साधनेसाठी दिलेले एक साधन आहे’, हे जाणून स्‍वतःत पालट करावा. सतर्कता असल्‍यास ‘अंतर्मनात काय चालले आहे ?’, हे जाणून घेणे शक्‍य होते. गुरुदेवांनी समष्‍टी सेवेला महत्त्व देऊन स्‍वतःमध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍याची संधी दिली आहे. प्रत्‍येकाच्‍या प्रकृतीनुसार त्‍याचे आचार-विचार, कृती आणि संस्‍कार वेगळे असतात. प्रत्‍येक प्रकृतीशी जुळवून घेणे, इतरांकडून येणारी स्‍पंदने ओळखून त्‍यानुसार स्‍वतःत पालट करणे, हे अंतर्मुखतेनेच शक्‍य होते.

२ आ. दुसरा टप्‍पा – साधकांविषयी प्रतिक्रियात्‍मक विचार आल्‍यास त्‍यामागील स्‍वभावदोष शोधून स्‍वभावदोषांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया करणे : प्रत्‍येक साधक हा आपल्‍यासाठी जणू आरसा आहे. ‘व्‍यक्‍तींशी जुळवून घेतांना आणि कृती करतांना आपल्‍या मनात नकारात्‍मक अन् प्रतिक्रियात्‍मक विचार आले, तर ते स्‍वभावदोषांचे प्रकटीकरण आहे’, असे समजून स्‍वभावदोष शोधून त्‍यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया करायला हवी. अंतर्मुख होऊ लागल्‍यावर साधकाला ‘स्‍वभावदोष आपल्‍यातच आहेत आणि समोर आलेली व्‍यक्‍ती अथवा प्रसंग यांमुळे ते प्रगट होत आहेत’, हे लक्षात येऊ लागते. ‘ती व्‍यक्‍ती अथवा प्रसंग हे केवळ माध्‍यम आहेत’, हे लक्षात आल्‍याने साधकाची अंतर्मुखता वाढू लागते. साधक समष्‍टी सेवा करत असल्‍यास त्‍याच्‍यात सहजतेने पालट होतो.

३. अंतर्मुखतेकडे वाटचाल करतांना येणारी मोठी अडचण म्‍हणजे बहिर्मुखता आणि तिच्‍यामुळे होणारी हानी

प्रारंभी प्राथमिक टप्‍प्‍यावर सर्वच जण कमी-अधिक प्रमाणात बहिर्मुख असतात. त्‍या वेळी बहिर्मुखतेने आपण इतरांकडे बोट दाखवतो आणि स्‍वतःतील स्‍वभावदोषांचे समर्थन करतो. बहिर्मुखतेमुळे आपल्‍याला इतरांच्‍या चुका अधिक दिसतात. असा साधक ‘इतरांकडून काय चूक होते ?’, याकडे अधिक लक्ष देतो आणि ‘स्‍वतःच्‍या मनात काय चालले आहे ?’, याकडे लक्ष देण्‍यात उणा पडतो. त्‍यामुळे तो शिकण्‍याच्‍या स्‍थितीत रहात नाही. अन्‍य साधक चूक सांगत असतांना आपण स्‍वतःचे समर्थन करून किंवा निष्‍कर्ष काढून बोलत असू, तर ‘ती पराकोटीची बहिर्मुख वृत्ती आहे’, हे लक्षात घ्‍यावे.

४. अंतर्मुखता वाढवण्‍याचे उपाय

अ. इतरांचा विचार अधिक प्रमाणात करावा.

आ. स्‍वभावदोषांचे निर्मूलन करण्‍यात न्‍यून पडलो, तर गुरुदेव तोच प्रसंग पुनःपुन्‍हा निर्माण करून साधकांत पालट घडवतात. त्‍यामुळे चुकांत अडकून संघर्ष करण्‍यापेक्षा योग्‍य दृष्‍टीकोन घेऊन स्‍वभावदोषांचे निर्मूलन करण्‍याचा प्रयत्न केला पाहिजे.

इ. चूक झाल्‍यावर त्‍यातून शिकून पुढे गेले पाहिजे. अन्‍यथा पुढच्‍या सेवा करतांना मागच्‍या चुका मनात येत रहातात आणि साधक सेवेच्‍या आनंदापासून वंचित रहातात. चुका झाल्‍यावर दुःखी होण्‍यापेक्षा ‘त्‍या चुकांमधून काय शिकायला मिळाले ?’, याकडे लक्ष दिल्‍यास मन अंतर्मुख होते आणि शिकण्‍यातून आनंद मिळतो.

५. अंतर्मुखतेतून साध्‍य करायची स्‍थिती

साधनेमुळे साधकांची अशी स्‍थिती निर्माण झाली पाहिजे की, कोणत्‍याही साधकाला पाहिले किंवा कोणतीही सेवा मिळाली, तरी साधकाच्‍या मनात थोडीसुद्धा नकारात्‍मक अथवा प्रतिक्रियात्‍मक स्‍पंदने येऊ नयेत.

६. मन अंतर्मुख झाल्‍यावर साधकांत होणारे पालट 

अ. साधकांची अंतर्मुखता वाढल्‍यावर त्‍यांना अन्‍य साधकांतील स्‍वभावदोषांपेक्षा त्‍यांचे गुण अधिक प्रमाणात दिसू लागतात. ‘समाजातील व्‍यक्‍तींपेक्षा साधक श्रेष्‍ठ आहेत’, याविषयी त्‍यांना कृतज्ञता वाटू लागते.

आ. इतरांची चूक सांगत असतांना ती भावना, बुद्धी आणि मानसिक स्‍तर या स्‍तरांवर न सांगता आध्‍यात्मिक दृष्‍टीकोनातून सांगितली जाते. साधकांना साहाय्‍य करण्‍याची भूमिका अधिक असते.

इ. ‘आधी साधक, नंतर साधना आणि शेवटी कार्य’, असा दृष्‍टीकोन साधकांत जागृत होऊ लागतो.

ई. अंतर्मुखतेमुळे व्‍यक्‍तीमध्‍ये निरपेक्ष प्रीतीचे प्रमाण वाढून अन्‍य साधकांमध्‍ये मिसळणे आणि त्‍यांच्‍याकडून शिकणे, ही वृत्ती वाढते.

उ. ‘प्रत्‍येक गोष्‍ट ईश्‍वरेच्‍छेनेच होते’, हे लक्षात येऊन अहं नष्‍ट होऊ लागतो आणि शरणागतभाव वाढतो.

७. साधकांनी अंतर्मुख होऊन आत्‍मपरीक्षण करणे, हीच गुरुदेवांच्‍या चरणी खरी कृतज्ञता !

अंतर्मनाचे (चित्ताचे) शुद्धीकरण होतांना ‘अंतर्मुखता’, ‘अंतर्निरीक्षण’ आणि ‘सतर्कता’ हे गुण महत्त्वाचे असतात. आपण अधिकाधिक साधक, तसेच प्रसंग यांना सामोरे जाऊन अंतर्मुखतेने परिस्‍थिती स्‍वीकारल्‍यास साधना वेगाने होऊ लागतेे. ‘साधकांची साधना होऊन त्‍यांनी मोक्षमार्गाकडे वाटचाल करावी’, या एकमेव उद्देशाने गुरुदेव साधकांसाठी अपार कष्‍ट करत आहेत. ‘साधकांनी अंतर्मुख होऊन आत्‍मपरीक्षण करणे’, हीच गुरुदेवांच्‍या चरणी खरी कृतज्ञता आहे.

माझे मन आणि बुद्धी यांमध्‍ये विराजमान होऊन सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी ही सर्व सूत्रे लिहून घेतली. हे लिखाण त्‍यांच्‍या चरणी अर्पण !’

– (पू.) के. उमेश शेणै, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.५.२०२३)