मिरजे येथे युवा अभियंत्याने श्री गणेशमूर्तीसमोर साकारला बारा ज्योतिर्लिंगांचा देखावा !

कोरीव नक्षीकाम आणि शिवलिंग यांनी वेधले लक्ष !

मिरज (जिल्हा सांगली), २५ सप्टेंबर (वार्ता.) – येथील युवा अभियंता श्री. सुदन जाधव यांनी स्वतःच्या घरातील श्री गणेशमूर्तीसमोर १२ ज्योतिर्लिंगांचा देखावा साकारला आहे. थर्माकॉल आणि पुठ्ठे यांच्या माध्यमातून बनवलेली आकर्षक, नक्षीदार आणि कोरीव १२ मंदिरे लक्ष वेधून घेत आहेत. १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना आणि त्याचा महिमा देखाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. हा देखावा पहाण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. आजवर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एकच मंदिर उभारल्याची अनेक उदाहरणे आहेत; मात्र युवा गणेशभक्ताने सर्व मंदिरे साकारून भाविकांना भगवान शिवशंकराच्या सर्व ज्योतीर्लिंगाचे एकाच ठिकाणी दर्शन घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे.

श्री. सुदन हे प्रत्येक वर्षी गणेशोत्सव काळात आपल्या कल्पकतेतून नाविन्यपूर्ण देखावे साकार करत असतात. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक विषयांवर त्यांनी अनेक देखावे साकारले आहेत. मागील २ वर्षांत त्यांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील १२ बलुतेदार आणि शिवराय यांचे अपरिचित शिलेदार या विषयावर ऐतिहासिक देखावे साकारले होते. काही मासांपूर्वी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिक येथील त्र्यंबकेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर त्यांना दर्शन रांगेत अनुमाने ६ घंटे उभे रहावे लागले. एकाच मंदिरात इतका वेळ लागत असेल, तर १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन कधी व्हायचे? सर्व ज्योतिर्लिंगांची परिक्रमा करण्यासाठी अनेक दिवस लागतात. त्यामुळे एकाच दिवशी १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन झाले, तर योग्य होईल, हा विचार करून त्यांनी हा देखावा केला आहे.

श्री. सुदन यांनी सदरची सर्व मंदिरे आणि शिवलिंगांच्या प्रतिकृती हुबेहुब साकारण्याचा प्रयत्न केला आहे.