सातारा, २४ सप्टेंबर (वार्ता.) – सातारा नगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. सातारा नगरपालिकेने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांविषयी सुज्ञ सातारावासीय तीव्र संताप व्यक्त करत आहेत. ‘निविदा संस्कृती’ जपण्यासाठीच सातारा नगरपालिका कृत्रिम तलावांच्या निर्मितीला प्राधान्य देत नाहीत ना ? अशी शंका सूज्ञ सातारावासीय उपस्थित करत आहेत. (केवळ सातारा येथेच नाही, तर अन्य जिल्ह्यांत वहात्या पाण्यात विसर्जनाऐवजी कृत्रिम हौद, फिरते हौद यांसाठीही स्थानिक प्रशासन आग्रही असते. यामागे त्यांची काही आर्थिक गणिते आहेत का ? याचा शोध घेणे आवश्यक आहे ! – संपादक)
काही वर्षांपूर्वी सातारा नगरपालिका आणि काही सामाजिक संघटना यांच्या वतीने ‘श्री गणेशमूर्ती दान’ ही अशास्त्रीय मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने प्रखर विरोध दर्शवण्यात आला. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन सातारा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने ही मोहीम तात्काळ थांबवण्यात आली; मात्र श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नैसर्गिक जलस्रोतांचा वापर करण्यात येऊ नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याचे कारण पुढे करत कृत्रिम तलावांची संकल्पना पुढे आणली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा वेगळा अर्थ लावत ‘श्री गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जनास बंदी’, याचा सातारा नगरपालिकेकडून बाऊ करण्यात आला, तसेच विसर्जनास बंदीचे फलक सातारा शहरातील नैसर्गिक जलस्रोतांच्या बाहेर झळकावण्यात आले. यामुळे सातारा नगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षी सातारावासियांच्या कर रूपातून गोळा झालेल्या पैशांतून ७० ते ८० लाख रुपये खर्च करून कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सातारा नगरपालिकेच्या या कृतीला वेळोवेळी प्रखर विरोध दर्शवला आहे; मात्र या विरोधाला न जुमानता सातारा नगरपालिका ‘निविदा संस्कृती’ जपण्याचे अत्यंत प्रामाणिक प्रयत्न प्रतिवर्षी करत आहे. कृत्रिम तलावांऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी अनेक वेळा सूचित करण्यात येऊनही सातारा नगरपालिका कृत्रिम तलावांनाच प्राधान्य का देत आहे ? हा प्रश्न सातारावासियांनाही भेडसावत आहे.