कोल्हापुरात गणेशभक्तांकडून बॅरिकेट्स (तात्पुरते अडथळे) तोडून पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

  • प्रशासनाकडून नदीत मूर्ती विसर्जनाला विरोध !

  • ४ वर्षांनंतर भाविकांकडून नदीत मूर्तीविसर्जन !

कोल्हापूर – प्रशासनाने भाविकांना श्री गणेशमूर्तींचे पंचगंगा नदीत विसर्जन करण्याची अनुमती न देता विसर्जनस्थळी ‘बॅरिकेट्स’ (तात्पुरते अडथळे) लावून तेथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. शेकडो हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आणि गणेशभक्त यांनी घाटमार्गावर लावलेले बॅरिकेट्स तोडून श्री गणेशमूर्तींचे नदीतच विधीवत् विसर्जन केले. या वेळी हिंदुत्वनिष्ठांकडून ‘जय श्री राम’ असा जयघोष करण्यात आला. हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांच्या संघटित शक्तीपुढे प्रशासनाला नमते घ्यावे लागले. ४ वर्षांनंतर भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन केले.


प्रशासन वारंवार ‘उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे आम्ही पालन करत आहोत’, असे सांगत होते आणि तशा आशयाचे फलक नदीच्या परिसरात लावले होते. उच्च न्यायालयाच्या, तसेच प्रदूषण मंडळाच्या आदेशात कुठेही ‘सक्ती’ नसतांना प्रशासन मात्र भाविकांवर सक्ती करत होते. यामुळे तेथे उपस्थित भाविकांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली. या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, बजरंग दलाचे श्री. पराग फडणीस, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, श्री. शिवानंद स्वामी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते अन् भाविक उपस्थित होते. ‘गणपति बाप्पा मोरया’, असे म्हणत सहस्रोंच्या संख्येत गणेशभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ विसर्जनस्थळी येत होते.

वर्षभर नदीत सांडपाणी मिसळले जात असतांना प्रशासन झोपलेले असते का ?

या प्रसंगी गणेशभक्तांनी, ‘नदीत प्रदूषण केवळ श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळेच होते का ? वर्षभर नदीत सांडपाणी मिसळत असतांना प्रशासन झोपलेले असते का ?’ असे प्रश्‍न उपस्थित केले.

न्यायालयाचा मशिदीवरील भोंगे काढण्याचाही आदेश आहे, मग त्याचे पालन प्रशासन कधी करणार ? – उदय भोसले, शिवसेना, उपजिल्हाप्रमुख

‘हिंदूंचे सण आल्यावरच प्रशासनाला प्रदूषण कसे काय आठवते ? प्रदूषण होऊ नये; म्हणून जे प्रशासन आज ‘न्यायालयाचा आदेश आहे’, असे सांगत आहे, ते प्रशासन मशिदींवरील भोंगे काढण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन कधी करणार आहे ?’, असा प्रश्‍न शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले यांनी या प्रसंगी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.

लोकप्रतिनिधींनी गणेशभक्तांच्या बाजूने लोकप्रनिधींनी कणखर भूमिका का घेतली नाही ?

गतवर्षी याचप्रकारे इचलकरंजी येथे प्रशासनाने भाविकांवर श्री गणेशमूर्तींचे विसर्जन न करण्याची बळजोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सामूहिकपणे विरोध केला, तसेच अपक्ष आमदार श्री. प्रकाश आवाडे हे गणेशभक्तांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. श्री. आवडे यांनी तत्कालीन पर्यावरणमंत्री श्री. दीपक केसरकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. तेव्हा पर्यावरणमंत्र्यांनी ‘प्रशासनाने अशा प्रकारे सक्ती करू नये’, असे आवाहन केले होते. त्यामुळे प्रशासनाला नमती भूमिका घ्यावी लागली होती आणि इचलकरंजी येथे श्री गणेशमूर्तींचे पंचगंगा नदीतच विसर्जन झाले होते. अशाच प्रकारे यंदा कोल्हापूर येथे कुठल्याही लोकप्रनिधींनी गणेशभक्तांच्या बाजूने कणखर भूमिका का घेतली नाही ? असा प्रश्‍न भाविकांकडून उपस्थित केला जात आहे.

गडहिंग्लज शहरात (कोल्हापूर) मूर्तीदान मोहिमेचा फज्जा उडाला !

गडहिंग्लज – शहरात मूर्तीदान मोहिमेचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. ९० टक्केहून अधिक हिंदूंनी उत्स्फूर्तपणे मूर्तीविसर्जन केले आहे. विविध हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या जागृतीमुळे गणेशभक्तांनी धर्मविरोधी मूर्तीदान मोहिमेकडे पाठ फिरवली आहे.