छत्तीसगडचे भाजपचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि प्रवक्ते संबित पात्रा यांच्या विरोधातील गुन्हा रहित करा !

  • छत्तीसगड उच्च न्यायालयाचा आदेश !

  • काँग्रेसच्या सरकारविरोधी कथित ‘टूलकिट’ प्रकरणी प्रविष्ट केली होती तक्रार !

(टूलकिट म्हणजे एखादे कथानक सर्वत्र प्रसारित करण्यासाठी राबवण्यात येणारी व्यापक योजना !)

डावीकडून रमण सिंह आणि संबित पात्रा

बिलासपूर (छत्तीसगड) – छत्तीसगड उच्च न्यायालयाने राज्याचे माजी मुख्मंत्री आणि भाजपचे नेते रमण सिंह, तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्या विरोधात नोंद केलेला गुन्हा रहित करण्याचा आदेश दिला. न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणी दोघांच्या विरोधात कोणतेही गुन्हेगारी प्रकरण बनत नाही. मे २०२१ मध्ये काँग्रेसने दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता.

काय आहे प्रकरण ?

रमण सिंह आणि संबित पात्रा यांनी १८ मे २०२१ या दिवशी ट्विटरद्वारे काँग्रेसच्या नावाने ‘टूलकिट’ प्रसारित केले होते. कोरोना महामारीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांच्या विरोधात कशा प्रकारे कृती करायची, यासंदर्भात काँग्रेसने हे ‘टूलकिट’ प्रसारित केल्याची माहिती दोघांनी ट्वीटद्वारे दिली होती. ट्वीटला ती टूलकिटही जोडण्यात आली होती. याच्या विरोधात काँग्रेसच्या युवा शाखेने त्या दोघांच्या विरोधात पोलिसात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.