‘इंडिया’ने भारताला गुलाम बनवून ठेवले आहे !

डॉ. अजय सिंह, अध्‍यक्ष, वर्ल्‍ड हिंदू फेडरेशन

‘आज भारताला हिंदुस्‍थान बनवता बनवता नेहरूंच्‍या विचाराने त्‍याला ‘इंडिया दॅट इज भारत’ (इंडिया जो भारत आहे) बनवला. इंग्रज आणि इंग्रजांशी निगडित असलेला ५ टक्‍के भारत ९५ टक्‍के भारतावर राज्‍य करत आहे. या भारताचे प्रतिनिधी कॉन्‍व्‍हेंटचे पदवीधर असले, तरी ‘इंडिया’ आणि भारत यांच्‍या संदर्भातील त्‍यांच्‍या विचारात अन् वागण्‍यात काहीही भेद नाही. या ‘इंडिया’ने भारताला गुलाम बनवून ठेवले आहे. ते ‘भारता’ला ‘इंडिया’च्‍या चकाकीमध्‍ये रूपांतरित करण्‍यासाठी आतूर आहेत.

जेव्‍हा गांधीजी म्‍हणाले होते, ‘‘इंग्रज भारतात राहिले, तरी इंग्रजीपणाचा अंत होणे आवश्‍यक आहे.’’ तेव्‍हा नेहरूंना हे आवडले नाही. नेहरू म्‍हणाले होते, ‘‘इंग्रजीपणाचा अंत, म्‍हणजे आधुनिक सभ्‍यता आणि विकास यांचा अंत होईल. इंग्रजांना जाऊ द्या; पण इंग्रजीपणाला आपण आपले समजून स्‍वीकारू. अन्‍यथा भारत बैलगाड्यांच्‍या काळातीलच राहील. तो रानटी युगासारखा पूर्णपणे असंस्‍कृत ‘पेड चढैया और खेल बसैया’वाला (झाडांवर चढणारा आणि खेळणारा) भारत असेल, आजचा भारत नाही.’’

भारताचा ‘इंडिया’ करणारी गोष्‍ट तेव्‍हापासूनच बलवान होऊ लागली होती, जेव्‍हापासून लोकमान्‍य टिळक आणि योगी अरविंद यांच्‍यासारख्‍या लोकांना संदर्भहीन म्‍हटल्‍याचे जाऊ लागले होते, महाकवी कालिदास यांना ‘भारताचा शेक्‍सपियर’ आणि महाभारतातील महाबली भीमाला ‘हरक्‍यूलिस’ (ग्रीकमधील प्रसिद्ध नायक) म्‍हटले जाऊ लागले होते.

या सगळ्‍यांचा अर्थ स्‍पष्‍ट आहे की, जे पाश्‍चिमात्‍यांंसारखे नाही, ते संदर्भहीन, निरर्थक आणि मूर्खपणाचे आहे. ‘इंडिया’ने भारताला निराश केले आहे. त्‍याच निराश भारताला पाश्‍चिमात्‍य देशांची प्रतिलिपी (कार्बन कॉपी) बनण्‍यात अभिमान वाटू लागला आहे.’

– डॉ. अजय सिंह, अध्‍यक्ष, वर्ल्‍ड हिंदू फेडरेशन