१३ सप्टेंबर २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण मुलांचे आहार नियोजन असणे पुष्कळ महत्त्वाचे आहे, हे बघितले होते. आता आहार नियोजन करायचे, म्हणजे नेमके काय ? वयानुसार कोणता आहार मुलांना द्यावा ? हे आज बघणार आहोत. मुलांच्या आहारानुसार त्यांच्या ३ अवस्था आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत.
१. केवळ दूध पिणारे
अ. आधुनिक शास्त्रानुसार बाळांना प्रारंभीचे ६ मास केवळ आईच्या दुधावरच ठेवावे. या बाळांचे पोषण हे आईच्या दुधातूनच होत असते. या वेळी मुलांना वरचे पाणीसुद्धा देऊ नये. आईच्या दुधामुळे मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, जबड्याची वाढ व्यवस्थित होते, मानसिक भावबंध निर्माण होतात.
आ. आता बाळाचे पूर्ण पोषण आईच्या दुधावर होणार, तर आईने आपला आहार संतुलित ठेवणे, वेळच्या वेळी जेवणे, सर्व पौष्टिक पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करणे आवश्यक आहे. पौष्टिक म्हणजे काय, तर आळीव खीर, सुका मेवा, डिंकाचे लाडू, सर्व पालेभाज्या, वरण, तूप लावून केलेली पोळी हे सर्व पदार्थ आपल्या आहारात आईने घ्यावेत, म्हणजे आईच्या दुधातून बाळाला सर्व पोषक मूल्ये मिळतील. हे पदार्थ पौष्टिक म्हणून त्याचा अतिरेकही करू नये. इथे सुद्धा ‘पचेल एवढे खाणे’, हाच नियम लागू होतो.
इ. आई जेवढ्या प्रसन्न मनाने अन्न ग्रहण करील, तेवढा अधिक लाभ बाळाला मिळतो. सध्या वजन वाढण्याची भीती मनात असल्याने बर्याच जणी वर उल्लेख केलेले सर्व पौष्टिक पदार्थ खाण्याचे टाळतात; पण आपला आहार संतुलित आणि पचेल एवढा असला, तर वजनाची काळजी करू नये. बाळाच्या वयाची २ वर्षे हे त्याच्या वाढीच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे असल्याने आईने स्वतःच्या वजनापेक्षा बाळाला अधिक प्राधान्य दिले पाहिजे.
ई. ज्या बाळांना आईचे दूध देणे शक्य होत नाही, अशा बाळांना गायीचे दूध द्यावे. म्हशीचे दूध देऊ नये; कारण ते पचायला जड असते.
२. दूध आणि अन्न असे दोन्ही घेणारे
अ. ६ मासांनंतर हळू हळू बाळाला आईचे दूध न्यून करून वरचे अन्न द्यायला प्रारंभ करावा. हे पदार्थ पातळ स्वरूपात असावेत. जसे की, भाताची पेज, फळांचा रस, शिजलेल्या डाळींचे पाणी तूप घालून द्यावे, रव्याची खीर, भाज्यांचे सूप, नाचणी सत्त्व इत्यादी. यामुळे मुलांना विविध चवी कळू लागतात आणि त्यांना सर्व पदार्थ खाण्याची सवय लागते. फळांचा रस देतांना तो आंबट नसावा.
याचे प्रमाण १-१ चमचा, नंतर २-२ चमचे असे द्यावे. हळू हळू प्रमाण वाढवत न्यावे. हे पदार्थ दिवसातून २-३ वेळा देण्यास हरकत नाही. आईला मुलाने भरपूर खाल्ले की, समाधान वाटणे साहजिक आहे; पण मुलांनी एकदम पुष्कळ खावे, अशी अपेक्षा न करता त्याच्या आवडीने ते किती आणि कोणते पदार्थ खात आहे ? याचा अभ्यास करावा.
आ. आपण दिलेला आहार योग्य प्रमाणात दिला जातो आहे कि नाही ? हे पडताळण्यासाठी बाळाच्या वाढीचे टप्पे लक्षात घ्यावेत. जन्म झाल्यावर चौथ्या दिवशी बाळाचे वजन १० ते १५ टक्के न्यून होते. त्यानंतर पुन्हा ते वाढत जाते. ४ मासांच्या अखेरीस बाळाचे वजन दुप्पट आणि वर्षाच्या अखेरीस तिप्पट होते. याप्रमाणे बाळाचे वजन वाढत आहे ना, याकडे लक्ष द्यावे.
इ. ७ व्या-८ व्या मासात मुलांना दात येण्यास प्रारंभ होतो. तेव्हा पोळी कुस्करून दूध किंवा पातळ वरणासह द्यावी, मऊ वरणभात द्यावा. उकडलेला बटाटा, लाल भोपळ्याची भाजी, शिरी दोडके, घेवडा अशा भाज्यांच्या फोडी वरणभातात कुस्करून द्याव्या.
ई. मूल वर्षाचे झाले की, पोळीचा तुकडा, मऊ गर असलेल्या फळाची फोड, भाज्या घालून केलेला पराठ्याचा तुकडा, लाल भोपळा आणि गूळ घालून केलेल्या गोड पुर्या, नाचणीच्या पिठाचे घावन (धिरडे), तांदळाचे घावन असे पदार्थ त्याच्या हातात द्यावेत. या वयात मुले स्वतःच्या हाताने पदार्थ तोंडात टाकतात. शेंगदाणे, फुटाणे असे पदार्थ त्यांच्या हातात देऊ नये; कारण ते एकदम गिळल्यास घशात अडकू शकतात. या वेळी जर बिस्कीट, पाव, केक अशा पदार्थांची चव मुलांना दिली, तर मुळात गोड चव मुलांच्या आवडीची आणि त्यात अशा पदार्थांची चव आपण त्यांना देत असू, तर मूल वारंवार तेच पदार्थ मागायला लागते.
उ. वयाच्या २ वर्षांनंतर मुलांना आपल्यासह जेवायला घेऊन बसावे. तो जेवढे स्वतःच्या हाताने जेवेल तेवढे जेवू द्यावे. यामुळे मुलांना स्वतःच्या हाताने जेवायची सवय लागते. जर स्वतःच्या हाताने मुलाने खाल्ले नाही, तरच आईने त्याला भरवावे. प्रारंभीपासूनच आईने भरवण्याची सवय लावली, तर मूल स्वतःच्या हाताने खाण्याचे टाळते आणि मग आईची मुलाने जेवावे, यासाठी कसरत चालू होते. दूध देण्याचे प्रमाण हळू हळू न्यून करावे. जेवणाच्या ऐवजी मूल फक्त दूध पित असेल, तर त्याचे पोषण योग्य प्रकारे होणार नाही. ‘काही नाही खात, तर निदान दूध तरी पिऊ द्यावे’, या विचाराने पालकसुद्धा मुलांना अतिरिक्त दूध द्यायला लागतात. इथे अतिरिक्त दुधामुळे होणारे अपचन लक्षात घेऊन भरपूर दूध पिण्याचा आग्रह मुलांना करू नये. ‘मूल जेवत नाही’, ही तक्रार याच वयोगटाच्या कालावधीत सर्व आयांची असते. त्यातील बहुतांश वेळी अपचन, हेच कारण असते आणि नैसर्गिकरित्या मूल जेवणाचे नाकारते.
३. केवळ अन्न घेणारे
३ वर्षांनंतर मूल शाळेत जाऊ लागते, तेव्हा घरी केलेले सर्व पदार्थ मुलांना वाढावेत. वरण, भात, भाजी, पोळी असा संपूर्ण आहार मुलांना द्यावा. दिवसातून एक वेळ दूध पिल्यास हरकत नाही.
अ. या वयात शाळेचा डबा चालू होतो. बर्याच शाळांमध्ये ‘आता भाजी पोळीच दिली जावी’, असा आग्रह असतो आणि हा अगदी स्तुत्य निर्णय आहे. त्यामुळे सर्व मुलांच्या डब्यात भाजी पोळी असल्याने मुले सँडविच, केक, बिस्कीट, सॉस, जॅम अशा बाहेरील पदार्थांकडे आकृष्ट होत नाहीत.
आ. बाहेरील पदार्थांचे आकर्षण हे सध्याच्या काळात टाळणे बर्याच वेळा शक्य नाही; पण त्याची वारंवारता किती असावी ? हे मात्र आपण ठरवायला हवे. १५ दिवसातून किंवा मासातून एकदा बाहेरील पदार्थ खाण्यात आल्यास हरकत नाही; पण प्रत्येक शनिवार, रविवार सुट्टी आहे, तर बाहेर खायला जाण्याची पालकांची सवय असेल, तर मुलांनाही तशीच सवय लागते.
इ. बाहेरील पदार्थांचे आकर्षण न्यून व्हावे, यासाठी ते पदार्थ घरीच कसे करता येतील, ते बघावे. बाहेरच्या तुलनेत घरी केलेला तोच पदार्थ आरोग्यास बाधा आणत नाही. इथे आईला कष्ट नक्कीच आहेत; पण आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी तेवढे कष्ट प्रत्येक आईने घ्यावेत.
ई. मुलांना कोणता खाऊ दिला जावा ? हे आपण मागच्या लेखात बघितले आहेच. तरी पुन्हा एकदा या पदार्थांची सूची येथे देत आहे – शेंगदाणा – गूळ लाडू, गूळ खोबरे सारण असलेल्या करंज्या, फुटाणे, नाचणीच्या पिठाचे लाडू, मूग भाजून केलेले लाडू, खजूर वडी, भाजलेल्या कणकेचे गूळ घालून केलेले लाडू हे झाले सर्व गोड पदार्थ. यामध्ये आवर्जून गुळच घालावा, साखर टाळावी. याखेरीज साळीच्या, ज्वारीच्या, भाजक्या पोह्यांचा चिवडा; तूप-जिरे फोडणी घातलेले मखाणे, राजगिरा लाडू, राजगिरा किंवा शिंगाडा यांचा शिरा असे खाऊ करावेत. तसेच अन्यही पदार्थ करता येतील. आईने कल्पकतेने सर्व चवीचे पदार्थ मुलांना द्यावेत.
– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे. (१८.९.२०२३)