(म्‍हणे) ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ शब्‍द गाळून देशाची दिशा पालटण्‍याचा सरकारचा  प्रयत्न !’ – जितेंद्र आव्‍हाड, आमदार, राष्‍ट्रवादी काँग्रेस

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड

मुंबई – नवीन संसद भवनामध्‍ये राज्‍यघटनेची जी प्रत देण्‍यात आली आहे; त्‍यामधून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्‍द गाळण्‍यात आले आहेत. याचा अर्थ काय समजायचा ? राज्‍यघटनेमध्‍ये असा पालट करता येतो का ? ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’  शब्‍द गाळून भारताची राजकीय आणि सामाजिक दिशा पालटण्‍याचा प्रयत्न हे सरकार करत आहे, हे यावरून स्‍पष्‍ट होते, असे ट्‍वीट राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांनी केले आहे.

आव्‍हाड यांच्‍या या ‘ट्‍वीट’वर नेटकर्‍यांनी काही अभ्‍यासपूर्ण प्रतिक्रिया व्‍यक्‍त केल्‍या आहेत. ‘याचा अर्थ आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूळ राज्‍यघटना लोकांपर्यंत पोचेल. इंदिरा गांधी यांनी राज्‍यघटनेत छेडछाड केली होती. ती दुरुस्‍त झाली !’, अशी प्रतिक्रिया एकाने व्‍यक्‍त केली आहे.

अन्‍य एका नेटकर्‍याने ‘‘काँग्रेसने स्‍वातंत्र्यापासून धर्मनिरपेक्षच्‍या नावावर अल्‍पसंख्‍यांकांचे लांगूलचालन केले आणि बहुसंख्‍य हिंदु समाजाला कायम डावलले’, अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली आहे. आव्‍हाड यांच्‍या या ‘ट्‍वीट’वरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्‍या आहेत.

वर्ष १९७६ मध्‍ये तत्‍कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणिबाणी असतांना राज्‍यघटनेत ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवाद’ हे शब्‍द घुसडले. या शब्‍दांची नेमकी व्‍याख्‍याही राज्‍यघटनेत देण्‍यात आलेली नाही.

संपादकीय भूमिका 

लोकशाहीला धाब्‍यावर बसवून आणीबाणीच्‍या काळात राज्‍यघटनेत घुसडलेल्‍या या शब्‍दांवरून एवढी वर्षे ज्‍यांनी अल्‍पसंख्‍यांकांच्‍या लांगूलचालनाचे राजकारण केले, त्‍यांना हे शब्‍द हटवल्‍यावर पोटशूळ उठला नाही, तरच नवल होय !