मुंबईत श्री गणेशमूर्तींचे दर्शन घेण्‍यासाठी रात्रभर बससेवा !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – गणेशोत्‍सवाच्‍या काळात भक्‍तांना मुंबईतील विविध गणेशोत्‍सव मंडळांतील श्री गणेशमूर्तींचे दर्शन घेता यावे, यासाठी गणेशोत्‍सवाच्‍या शेवटच्‍या ५ दिवसांत ‘बेस्‍ट’ रात्रभर बससेवा उपलब्‍ध करून देणार आहे. २० ते २८ बसगाड्या मुंबई शहरात ५ ते ६ विविध मार्गांवर उपनगरातून शहराच्‍या दिशेने चालवण्‍यात येणार आहेत. काही साध्‍या, तर काही वातानुकूलित बस दादर, करी रोड, चिंचपोकळी, भायखळा, मुंबई सेंट्रल आदी भागांसाठी असतील.

मुंबई जिल्‍ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच मुंबई महापालिकेच्‍या ‘एफ् दक्षिण’ विभागाच्‍या सभागृहात मुंबई पोलीस, रेल्‍वे, बेस्‍ट, रेल्‍वे सुरक्षा बल यांसारख्‍या विविध प्राधिकरणांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्‍यांनी वरील सुविधेविषयी सूचना त्‍यांनी केली होती.

गणेशोत्‍सवाच्‍या काळात प्रवाशांची अधिक गर्दी असल्‍याने ‘मेगाब्‍लॉक’ असणार नाही, अशी माहितीही रेल्‍वे प्रशासनाने दिली आहे.