आज ‘ऋषिपंचमी’ आहे. त्या निमित्ताने…
‘श्री गणेशचतुर्थी नंतर लगेचच ऋषिपंचमी येते. ऋषींची आठवण काढत त्यांच्यासारखा आहार करण्याचा हा दिवस. त्या दिवशी बैलाच्या श्रमाचे काही खायचे नाही. शेतीकामाला बैल वापरला जाऊ लागला. त्याच्याही आधी शेती होतीच. पूर्वी ऋषिमुनी नागरी वस्तीपासून वेगळे राहून विविध प्रकारचा अभ्यास करायचे. त्यांपैकी अनेकांना घरदार, चूल-मूल आणि घरसंसार नसायचा. त्यामुळे ते आहारासाठी विविध प्रकारचे अन्नपदार्थ शोधायचे. त्यांच्या शोधबुद्धीने वनस्पतीचे ज्ञान ऋषिमुनींनी आपणास दिले. त्यांच्या या ज्ञानाचा आता आपल्याला उपयोग होतो. ऋषींनी समाजासाठी जे महान कार्य केले त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस, म्हणजे ऋषिपंचमी ! ऋषींची उपासना करायची, तर त्यांच्या आचरणाचे अंशतः अनुकरण होणे प्राप्त होते. ऋषिमुनी स्वतः मशागत केलेल्या कंदमुळांवर जीवन जगत असत. आपण तसे निदान एक दिवस करून पहाण्यास काय अडचण आहे. त्यामुळे निसर्गाशी आपले नाते जोडले जाते, हा उदात्त हेतू आहे.
आज आपण ऋषींचे स्मरण करून समाजातील ऋषितुल्य जीवन जगणार्या व्यक्तींचा सत्कार करावा. त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचा लाभ घ्यावा. जीवनाचा खरा उद्देश जाणून घ्यावा. समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करावेत. अशा प्रकारे ऋषिपंचमी समजून साजरी करावी.
१. ऋषिपंचमीच्या व्रताचा आहार
शक्यतो कच्च्या भाज्यांचा असावा. त्यात मीठ वापरायचे नाही. नैसर्गिक आणि शुद्ध सात्त्विक असा शुद्ध आहार ग्रहण करावा. निसर्गाच्या प्रसादाचा फराळ करायचा. काळे मीठ; पण त्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसावी, अशी प्रथा आहे. कीटक आणि बुरशीनाशके वापरलेला हायब्रिड भाजीपाला आणि फळे नको.
२. व्रत कसे करावे ?
भाद्रपद शुद्ध पंचमीच्या दिवशी रजस्वला अवस्थेत केलेल्या स्पर्शाचा दोष दूर होण्यासाठी आणि या ‘नैवस्तन मन्वंतरा’तील सप्तर्षी कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि त्यांची पत्नी अरुंधती या ८ जणांची पूजा या दिवशी केली जाते. ‘हे व्रत केवळ स्त्रियांनीच करावे’, असा गैरसमज आहे. हे व्रत सर्वांनीच करावे, असे आहे. ‘ऋषिमुनींनी जे काही नियम घातले, ते आपल्या भल्यासाठी आहेत’, हे लक्षात ठेवावे. ऋषींचे अंतःकरणपूर्वक स्मरण करावे आणि पुढील श्लोक म्हणावा.
नमोऽस्तु ऋषिवृन्देभ्यो देवर्षिभ्यो नमो नमः ।
सर्वपापहरेभ्यो हि वेदविद़्भ्यो नमो नमः ॥
अर्थ : सर्व पाप हरण करणार्या आणि वेदविद्या जाणणार्या सर्व ऋषीगण अन् देवर्षीगण यांना नमस्कार असो.
कश्यपोऽत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रस्तु गौतमः ।
जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः ॥
अर्थ : कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ हे सप्तर्षी मानले जातात.
या व्रताच्या दिवशी आयुर्वेदाचे दंतमंजन वापरावे. साध्या थंड पाण्याने स्नान करावे. एका पाटावर ९ सुपार्या मांडून पूजा करावी. आपल्या गोत्राचे प्रतिक असलेल्या ऋषींचे छायाचित्र, अन्यथा श्री गुरुदेव दत्तात्रयांच्या चित्राची पूजा करावी. गणपति उत्सव असल्याने ‘श्री गणेश पुराण’ अवश्य वाचावे. नांगरट न केलेल्या भूमीत पिकलेले धान्य, कंदमुळे, फळे यांचे ग्रहण करावे. या वस्तूस्थितीवर आधारित ‘भविष्य पुराणा’त ऋषिपंचमीची रूपकात्मक कथा आहे. एका कुटुंबात घरात विटाळ कालवल्यामुळे पत्नीस शुनी (कुत्री) आणि पतीस (बैल) वृषभ हे जन्म प्राप्त होतात. त्यांच्या मुलाने या पापाच्या परिहारार्थ ऋषिपंचमीचे व्रत केल्याने त्यांना सद़्गती प्राप्त होते. या दिवशी दिवसभर उपवास करून व्रतस्थ रहावे. परमेश्वर आणि ऋषींच्या चिंतनात वेळ घालवावा. असे सलग ७ वर्षे व्रत करून ८ व्या वर्षी उद्यापन करावे. ऋषिपंचमीच्या उपवासास कंदमुळे, दुधदुपते, वेलीवरचा भोपळा, काकडी, कोशिंबीर, वरी (वर्यांचे तांदूळ – भगर) आणि नाचणीही चालते. ऋषिमुनींचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करतांना जीवनाचा खरा उद्देश जाणून घ्यावा. समाजाच्या नैतिक आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करावेत. अशा रितीने आपण ऋषिपंचमी साजरी करावी.
ज्या स्त्रियांचा विटाळ गेलेला नाही, अशांनीही वरीलप्रमाणे नुसता उपवास करता येतो, म्हणजे वर्षभर घरात चुकून विटाळ कालवला गेला असेेल, तर पापाचे परिमार्जन होते.
३. सप्तर्षींचे मंत्र
ज्यांना प्रत्येक ऋषींचा वेगळा मंत्र म्हणायचा असेल, त्यांनी पुढील श्लोक म्हणावेत.
अ. कश्यप ऋषि :
कश्यपः सर्वलोकाद्यः सर्वभूतेषु संस्थितः ।
नराणां पापनाशाय ऋषिरूपेण तिष्ठति ॥ १ ॥
अर्थ : सर्व लोक, प्राणिमात्र यांच्या ठिकाणी वास करणारे कश्यप ऋषि माणसांच्या पापांचा नाश करण्यासाठी ऋषीरूपाने रहातात.
आ. अत्रि ऋषि :
अत्रेय च नमस्तुभं सर्वभूतहितैषिणे ।
तपोरूपाय सत्याय ब्रह्मणेऽमिततेजसे ॥ २ ॥
अर्थ : सर्व भूतमात्रांच्या हिताची इच्छा करणार्या, तपोरूप, सत्यप्रिय, ब्रह्मरूप आणि अतिशय तेजस्वी अशा हे अत्रि ऋषि तुम्हाला नमस्कार असो.
इ. भरद्वाज ऋषि :
भरद्वाज नमस्तुभ्यं सदा ध्यानपारायणः ।
महाजटिल धर्मात्मन् पापं मे हर सर्वदा ॥ ३ ॥
अर्थ : नित्य ध्यानमग्न, महाजटिल, धर्मात्मा अशा हे भरद्वाज ऋषि तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही नेहमी माझे पाप दूर करा.
ई. विश्वामित्र ऋषि :
विश्वामित्र नमस्तुभ्यं ज्वलन्मुख महाव्रत ।
प्रत्यक्षीकृतगायत्री तपोरूपेण संस्थितः ॥ ४ ॥
अर्थ : अत्यंत तेजस्वी, कठोर व्रत आचरणार्या, तपरूपाने वास करणार्या, ज्यांना गायत्रीमंत्राचा दृष्टांत झाला अशा हे विश्वामित्र ऋषि तुम्हाला नमस्कार असो.
उ. गौतम ऋषि :
गौतमः सर्वभूतानां ऋषीणां च महाप्रियः ।
श्रौतानां कर्मणां चैव सम्प्रदायप्रवर्तकः ॥ ५ ॥
अर्थ : गौतम ऋषि हे सर्व प्राणिमात्रांचे आणि ऋषींचे अतिशय प्रिय ऋषि, तसेच श्रौतकर्म संप्रदायाचे प्रवर्तक होत.
ऊ. जमदग्नि ऋषि :
जमदग्निर्महातेजास्तपसा ज्वलितप्रभः ।
लोकेषु सर्वसिद़्ध्यर्थं सर्वपापनिवर्तकः ॥ ६ ॥
अर्थ : जमदग्नि ऋषी आपल्या महान तेजाने, तपाने उजळून निघाले. ते या जगात सर्व सिद्धींची प्राप्ती करून देणारे आणि पापाचा पाश करणारे होत.
ए. वसिष्ठ ऋषि :
नमस्तुभ्यं वसिष्ठाय लोकांना वरदाय च ।
धर्मरूपाय सत्याय सूर्यान्वयहितैषिणे ॥ ७ ॥
अर्थ : लोकांना वर देणार्या, धर्मरूप, सत्यरूप आणि सूर्यवंशी राजांचे हित करणार्या वसिष्ठ ऋषींना नमस्कार असो.
ऐ. अरुंधति ऋषिपत्नी :
अरुन्धति नमस्तुभ्यं महापापप्रणाशिनि ।
प्रतिव्रतानां सर्वासां धर्मशीलप्रवर्तके ॥ ८ ॥
अर्थ : महापापाचा विनाश करणार्या, सर्व पतिव्रतांना धर्माचरणास प्रवृत्त करणार्या देवी अरुंधती तुम्हाला नमस्कार असो.
या पूजेत अर्पिले जाणारे षोडशोपचार अर्पण करतांना ‘अरुन्धतीसहितकश्यपादिऋषिभ्यो नमः । समर्पयामि ।’ म्हणजे ‘अरुंधतीसहित कश्यप आदी ऋषींना नमस्कार ! त्यांना मी (अमुक उपचार) अर्पण करतो’, असे म्हटल्याने ही पूजा थोडक्यात आटोपता येईल. षोडशोपचारांपैकी नैवेद्य दाखवतांना तो अन्नाचा न करता शुद्ध फळ आणि शाकाहाराचा असावा. (त्यासाठी अनेक प्रकारची कंदमुळे एकत्र शिजवली जातात.)
४. व्रताचा कालावधी
सामान्यतः घरातील अशुचित्व उदकशांतीने आणि घरातील माणसांचे अशुचित्व विविध व्रतांनी न्यून होते. अशा व्रतांमध्ये ऋषिपंचमी, कालाष्टमी इत्यादी व्रतांचा समावेश होतो. रजस्वलेच्या हातचे अन्न ग्रहण करणे, तिला स्पर्श होणे इत्यादी दोष पुरुषांच्याही हातून घडत राहिल्यास शास्त्रानुसार पुरुषांनाही ऋषिपंचमी अनिवार्य ठरते. ऋषिपंचमी हे व्यक्तीगत व्रत असल्यामुळे १२ वर्षे किंवा ५० वर्षांनंतर त्याचे उद्यापन करावे. हे व्रत ऐन तारुण्यात करणे अधिक इष्ट असते; कारण त्याच काळात दोष अधिक घडतात. स्त्रीची अनुमाने ५० वर्षांनंतर रजोनिवृत्ती होते; म्हणून ऋषिपंचमी व्रताचीही वृत्तनिवृत्ती होणे योग्य ठरते. इच्छा आणि अनुकूलता असेल, तर उद्यापनानंतरही ऋषीपंचमीचे व्रत करता येते.’
– ज्योतिषी ब.वि. तथा चिंतामणी देशपांडे (गुरुजी), वारजे, पुणे.
(साभार : मासिक ‘ललना’, ऑगस्ट २०१७)